समन्वयातून पूरपरिस्थितीवर मात शक्य - महापौर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

समन्वयातून पूरपरिस्थितीवर मात शक्य - महापौर

Share This
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व यंत्रणांनी हातात हात घालून आपसातील समन्वयातून चांगले काम केल्यास पूरपरिस्थितीवर मात करून चांगले पूर व्यवस्थापन करणे शक्य असल्याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी केले. पावसाळी पूर्वतयारीच्या कामांबाबत मुंबईतील विविध यंत्रणांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक महापौर सुनील प्रभू यांनी नुकतीच घेतली. त्या वेळी त्यांनी अधिकार्‍यांना विविध सूचना केल्या.

पावसाळी पूर्वतयारी कामांबाबत महानगरपालिका सज्ज झाली आहे. समुद्राला भरती असलेल्या दिवसांमध्ये विविध विभागांमध्ये जलउपसा करणार्‍या पंपांची संख्या वाढवून पावसाआधी झाडे छाटणीची कामे पूर्ण करण्याची सूचना महापौर सुनील प्रभू यांनी अधिकार्‍यांना केली आहे. दरम्यान, महापौरांच्या हस्ते सर्वप्रथम मुंबई मान्सून संकेतस्थळाचे तसेच पूर व्यवस्थापन मार्गदर्शिका-२0१३ या पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. महापौर पुढे म्हणाले की, पावसाळ्याच्या दिवसांत स्वाईन फ्ल्यू आणि लेप्टो या आजारांचा प्रादुर्भाव होतो. त्या दृष्टीने प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना महापौरांनी महापालिका प्रशासनाला केली. त्याचप्रमाणे पावसाळ्याच्या दिवसांत दरवर्षीप्रमाणे आरोग्य शिबिरांची संख्या वाढवण्याची सूचनाही महापौरांनी अधिकार्‍यांना या वेळी केली. 

दरम्यान, समुद्राला भरती असलेल्या दिवसांमध्ये विविध भागांमध्ये जलउपसा करणार्‍या पंपांची संख्या वाढवून पावसाअगोदर झाडे छाटणीची कामे पूर्ण करण्याची सूचनाही महापौरांनी केली. त्यानंतर एमएमआरडीए, भारतीय हवामान विभाग, नौदल, मुंबई पोर्ट ट्रस्ट, वाहतूक पोलीस, रेल्वे या प्राधिकरणांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून आपत्कालीन स्थितीत करावयाच्या उपाययोजनांचा आढावा महापौरांनी घेतला. याप्रसंगी सभागृह नेते यशोधर फणसे, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, बेस्ट समिती अध्यक्ष संजय(नाना) अंबोले, महापालिका आयुक्त सीताराम कुंटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त(पश्‍चिम उपनगरे) मनीषा म्हैसकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) असीम गुप्ता आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुंबई शहराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, ताशी ५0 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडला आणि त्याच वेळी समुद्राला भरती असेल तर मुंबईतील सखल भागात काही प्रमाणात पाणी साचते. ते साचलेले पाणी काढण्यासाठी १८५ ठिकाणी २२0 उदंचन पंप बसवण्यात आले आहेत. समुद्राच्या भरतीच्या दिवसांमध्ये पाणी साचून राहिल्यास व गरज पडल्यास त्या-त्या विभागांमध्ये तत्काळ अतिरिक्त उदंचन पंप बसवण्याची कारवाई पालिका प्रशासनाने करावी, अशा सूचनाही महापौरांनी केल्या. दरम्यान, मुंबई वाहतूक पोलिसांचे ८४ आणि महापालिकेचे १६ असे एकूण १00 सीसीटीव्ही कॅमेरे बृहन्मुंबईतील विविध चौकांमध्ये लावून साचलेल्या पाण्याचे चित्रीकरण करण्याचा उपक्रम अभिनव असल्याचेही महापौर या वेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages