महिलांनी तक्रारी निर्भयपणे मांडाव्यात - गायकवाड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महिलांनी तक्रारी निर्भयपणे मांडाव्यात - गायकवाड

Share This
मुंबई : समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे व त्यांना न्याय मिळावा हा उद्देश ठेऊन शासन महिला लोकशाही दिन आयोजित करत आहे. या महिला लोकशाही दिनात महिलांनी निर्भयपणे आपल्या तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सोमवारी येथे केले.

महिला लोकशाही दिन सोमवारी मंत्रालयात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रा. गायकवाड यांनी वरील आवाहन केले. या वेळी राज्यमंत्री प्रा. फौजिया खान, अल्पसंख्याक विभागाच्या अपर मुख्य सचिव टी. एफ. थेक्केकरा, महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल ऊके आदी मान्यवर उपस्थित होते. महिलांच्या अडचणी सोडवणे व त्यांना मार्गदर्शन शासकीय यंत्रणेकडून व्हावे यासाठी शासनाने ४ मार्च, २0१३ ला महिला लोकशाही दिन चार स्तरावर आयोजित करण्याचा निर्णय घेतला. तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्य स्तरावर मंत्रालय या ठिकाणी लोकशाही दिन आयोजित केला जातो. तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा चौथ्या सोमवारी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, तर विभागीय स्तरावरील विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्य स्तरावर मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. या महिला लोकशाही दिनात पीडित महिलेने विहित नमुन्यात अर्ज करावयाचा असून अर्जासहित प्रत्यक्ष उपस्थित राहावयाचं असते. हे अर्ज तहसील, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महिला व बालविकास अधिकारी तसेच महिला आयोगाच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. महिलांनी स्वत:च्या तक्रारी निवारणासाठी महिला लोकशाही दिनाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन प्रा. गायकवाड यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages