झोपडपट्टीवासीयांना धोक्याचा इशारा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

झोपडपट्टीवासीयांना धोक्याचा इशारा

Share This
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एन' विभागातील विक्रोळी (पश्‍चिम) आणि घाटकोपर (पश्‍चिम) परिसरातील डोंगर उतारावर येत्या पावसाळ्यामध्ये दरड किंवा संरक्षण भिंत पडून जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात राहणार्‍या नागरिकांनी या पावसाळ्यापूर्वी सुरक्षितस्थळी तातडीने स्थलांतर करावे आणि संबंधित झोपडपट्टी परिसरामध्ये महापालिकेतर्फे लावण्यात आलेल्या सूचना फलकांचे पालन करावे, असे जाहीर आवाहन पालिका प्रशासनातर्फे सर्व संबंधित झोपडपट्टीवासीयांना केले आहे.

महापालिकेच्या 'एन' विभागातील विक्रोळी (पश्‍चिम) परिसरातील लोकमान्य सोसायटी आणि जनकल्याण सोसायटी, वर्षा नगर, राहुल नगर, आंबेडकर नगर, कैलास कॉम्प्लेक्ससमोर, संजय गांधी नगर, उमा महेश आणि भीमाशंकर सोसायटी, गणेश नगर, हनुमान नगर या परिसरातील डोंगर उतारावर तसेच डोंगराळ भागात पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर घाटकोपर (पश्‍चिम) परिसरातील राम नगर, खंडोबा टेकडी, सोनिया गांधी नगर, एकता नगर, काजू टेकडी, कातोडी पाडा, पितामह रामजी नगर, भीम नगर या ठिकाणच्या टेकडीच्या/डोंगराच्या उतारावर असलेल्या परिसरामध्येही दरड कोसळण्याची किंवा संरक्षण भिंत पडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्थलांतर न करता तेथेच राहणार्‍या रहिवाशांनी स्वत:च्या जबाबदारीवर राहावे, नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना, जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्यास बृहन्मुंबई महापालिका प्रशासन त्याला जबाबदार राहणार नाही, असेही पालिका प्रशासनाने कळवले आहे.
   

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages