मुंबई : हार्बर मार्गावर १२ डबा लोकल चालविण्यासाठी सध्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. मानखुर्द रेल्वे स्थानकाशेजारी महात्मा फुले नगर या वस्तीत राहणार्या नागरिकांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ खालून भुयारी मार्ग रेल्वे प्रशासनाने बांधून द्यावा, अन्यथा प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम करू देणार नाही, अशा इशारा जय मल्हार सेवा मंडळाने दिला आहे.
|
मानखुर्द रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ च्या दरम्यान १९७५ सालापासून सुमारे २ हजार झोपड्यांची महात्मा फुले नगर ही लोकवस्ती आहे. येथे सुमारे ५ हजार लोक राहतात. वस्तीच्या तिन्ही बाजूला रेल्वे ट्रॅक, तर एका बाजूला नौदलाचे निषिद्ध क्षेत्र आहे. या भागातील नागरिकांना बाहेर पडण्यासाठी रेल्वेने कुठल्याही प्रकारे सुविधा दिलेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना रेल्वे ट्रॅक ओलांडण्याशिवाय दुसरा पर्याय रहात नाही. शाळकरी मुले, महिला, अपंग, वृद्ध आणि इतर नागरिकांना रस्त्यावर येण्यासाठी रेल्वे ट्रॅक ओलांडावा लागतो. त्यात अनेकांचा बळीही गेलेला आहे. त्यातच आता मानखुर्द स्थानकात १२ डबा लोकलसाठी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात आल्यानंतर येथील रहिवाशांचा येण्या-जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होणार आहे. तसेच आग, अपघातसारख्या प्रसंगी रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्याही येथे पोहोचू शकणार नाहीत, असे जय मल्हार सेवा मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ खालून रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्ग बांधून द्यावा आणि नंतरच प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम करावे, अशी मागणी जय मल्हार सेवा मंडळाने केली आहे, अन्यथा स्थानिक रहिवासी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम थांबवतील, अशा इशारा जय मल्हार सेवा मंडळाने दिला आहे.
No comments:
Post a Comment