झोपड्यांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

झोपड्यांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी

Share This
मुंबई : तत्कालीन पालिका आयुक्त श्रीवास्तव यांनी काढलेल्या त्या वेळच्या परिपत्रकानुसार पाइपलाइनची पाच मीटरची जागा सोडून झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यात यावा, या ठिकाणी केवळ झोपडपट्टीवासीयांसाठीच इमारत उभी करावी व त्यांचे टीडीआर पालिकेने बाजारात विकावे, अशी मागणी भाजपाचे आमदार प्रकाश मेहता यांनी मंगळवारी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.

मुंबई महानगरपालिकेकडून कुठल्याही झोपडीवर कारवाई करू नये, असे निर्देश असतानाही कारवाया करून रहिवाशांना बेघर केले जात असल्याचा आरोप मेहता यांनी केला. टिळक नगर पाइपलाइन जवळ कर्मचारी निवासी इमारत बांधली आहे तसेच कामा गल्लीबाहेर यार्ड मध्ये सुद्धा कार्यालयीन इमारत बांधली आहे. या धर्तीवरच राजावाडीतील १५00 झोपड्यांचेही त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणी प्रकाश मेहता यांनी केली आहे.

या झोपडपट्टीत राहणारे लोक आसपासच्या वसाहतीत घरकाम करणे, भाजीपाला विकणे अशी कामे करून आपला चरितार्थ चालवतात. त्यांना जर माहुल वा इतर ठिकाणी पाठविले तर त्यांची संपूर्ण आर्थिक व्यवस्थाच कोलमडून पडेल. उलट माहुल येथे केमिकल कंपन्या असल्याने वायुप्रदूषणामुळे त्यांच्या स्वास्थ्यास धोका निर्माण होईल. तसेच या ठिकाणी त्यांची मुले शिकत असल्याने त्यांना ते सोडावे लागेल. या सर्व गोष्टींचा विचार होणे आवश्यक असल्याचे मेहता यांनी सांगितले.

या झोपडपट्टीच्या पुनर्वसनाबाबत आपण स्वत: तत्कालीन अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांना अनेकदा पत्र लिहिले, मात्र त्यांनी यासाठी ३-४ वर्षे बैठकच बोलाविली नाही. त्यामुळे आयुक्तांनी या प्रकरणी लक्ष घालून या झोपडपट्टीवासीयांचे तत्कालीन आयुक्त श्रीवास्तव यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार त्याच ठिकाणी दोन मजल्यांची इमारत बांधून पुनर्वसन करावे. यामुळे त्याच ठिकाणी पुनर्वसन झाल्यास पालिकेलाही पीओपी खरेदी करावे लागणार नाही व पालिकेचे पैसे वाचतील, असे मेहता यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages