काही दिवसापूर्वीच फेसबुक या सोशल नेट्वर्किंग वेबसाईट वरून बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल गलिच्छ भाषेत पोस्ट टाकून बौद्ध धर्मियांच्या भावना भडकावण्याचे काम करण्यात आले होते. यावेळी बौद्ध धर्मियांनी शांततेने आंदोलन करून या प्रकारचा निषेध नोंदवला होता. या बाबत पोलिसांकडे तक्रार करून कायदेशीर पद्धतीने अशा बदनामी करणाऱ्यांवर कारवाही करावी अशी मागणी करण्यात आली. यामुळे ज्यांना आंबेडकरी जनतेत असंतोष निर्माण करून दंगली भडकवायच्या होत्या तो हेतू त्यांचा पूर्ण झालेला नाही. या नंतर लगेच महानायक मध्ये लेख लिहून हे षड्यंत्र असल्याचे व येणाऱ्या काळात निवडणुका जवळ आल्या असून याहून अधिक भायानय प्रकार होऊ शकतात अशी शक्यता आम्ही वर्तवली होती.
आज रविवारी ७ जुलै रोजी सकाळी पहाटे बिहार बुद्धगया येथे महाबोधी विहार परिसर 8 साखळी स्फोटांनी हादरला. या स्फोटांमध्ये 5 जण जखमी झाले असून मंदिराच्या परिसरातून 2 जिवंत बॉम्ब सुद्धा आढळून आले आहेत. स्फोटांमुळे महाबोधी वृक्षाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने हल्ल्यात प्राणहानी झालेली नाही. दोन परदेशी बौद्ध भिख्खू मात्र गंभीर जखमी आहेत त्यात म्यानमार आणि तिबेटच्या प्रत्येकी एका भिख्खूचा समावेश आहे. जखमींना गया मेडीकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. महाबोधी विहाराला रिकामे करण्यात आले आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
तपासांतीच स्फोटांचे नेमके कारण स्पष्ट करता येईल. विहाराच्या परिसरात 4 स्फोट झाले. तर 3 स्फोट कर्मापा मंदिरात झाले. येथील भगवान बुद्धांच्या 80 फूट उंच मुर्तीजवळही एक स्फोट झाला आहे. महाबोधी विहार परिसरात सकाळी 5.25 ते 5.58 वाजेपर्यंत हे स्फोट झाले. त्यावेळी विहारात भंतेजी आणि सफाई कामगार होते. ज्या ठिकाणी स्फोट झाले तेथेही जास्त गर्दी नव्हती त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. विहाराचे कोणतेही नुकसान झालेले नाही. म्यानमार आणि तिबेटच्या प्रत्येकी एका भिख्खूचा समावेश आहे.
हा हल्ला कोणी केला या बद्दल अजून माहिती मिळालेली नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तवली आहे. रविवारी बुद्धगया येथे विशेष प्रार्थनेचे आयोजन केले जाते. त्यासाठी मोठी गर्दी येथे होते यामुळे विहार परिसरात बॉम्ब पेरण्यात आले होते. याचा अर्थ या स्फोटाद्वारे मोठा घातपात घडवून आणण्याची तयारी होती. गेल्या काही महिन्यापासून विहार उडविण्याची धमकी दिली जात होती. दहशतवादी हल्ल्यासंदर्भात इशारा देण्यात आला होता. परंतु, तो गांभीर्याने घेण्यात आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विहाराच्या सुरक्षेत अनेक ठिकाणी त्रुटी आढळल्या आहेत.
महाबोधी विहार येथे पूण्यातील जर्मन बॆकरिच्या स्फोटांच्या आधी स्फोट केले जाणार होते. त्यासाठी विहाराची रेकी करण्यात आली होती तसेच विहारमध्ये विडीओ शुटींग सुद्धा करण्यात आल्याचे जर्मन बेकरी स्फोटातील मकबूल या अटक केलेल्या आरोपीने तपासात सांगितले असल्याने तसा इशारा बिहार सरकारला दिला गेला होता. परंतू सरकारने दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे असे सतत वृत्त वाहिन्यांवरून दाखवण्यात येत आहे. महाबोधी विहार परिसरात राज्य पोलिस, प्यारा मिलेटरी फोर्स, तसेच मंदिराची सुरक्षा आहे. इतकी सुरक्षा असतानाही हे बॉम्ब विहाराच्या परिसरात पेरण्यात आले होते. याचा अर्थ सुरक्षा व्यवस्था कमी पडली आहे.
सुरक्षा व्यवस्था कमी पडली असताना, पोलिस आणि एनआयए कडून या स्फोटांचा सर्व तपास होणे बाकी असताना सतत जर्मन बेकरीच्या आरोपींचे नाव पुढे केले जात आहे. काही वृत्त वाहिन्यांनी तर म्यानमार मध्ये मुस्लिम आणि बौद्ध यांच्यामध्ये असलेला संघर्ष व त्यामुळे होत असलेल्या मुस्लिम लोकांच्या कत्तली याचा संदर्भ दिला जात आहे. यावरून बौद्ध आणि मुस्लिम लोकांमध्ये वातावरण तापवून दंगे व्हावेत असे काही लोकांना व वृत्तवाहिन्यांना वाटत आहे असे दिसते.
महाबोधी विहारात असलेली सुरक्षा पाहता तेथे बाहेरून कोणीही जाऊन बॉम्ब लावणे अशक्य गोष्ट आहे यामुळे सुरक्षा व्यवस्थेला हाताशी धरूनच हे बॉम्ब लावले असावेत याची शक्यता नाकारता येत नाही. या स्फोटामुळे सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघानाही याचे राजकारण करता येणार आहे. बौद्ध धर्मीयांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण करून मते मिळवण्याचा सुद्धा हा प्रकार असू शकतो. लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका येत आहेत, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंगल घडवून त्यामध्ये सत्ता मिळवण्याचे सुद्धा हे एक षड्यंत्र असू शकते. यामुळे आंबेडकरी जनतेने जागृत राहून कुठेही दंगल होणार नाही याची दखल घेण्याची गरज आहे.
अजेयकुमार जाधव
Mob. No.- 09969191363
No comments:
Post a Comment