'गणेशोत्सवाच्या काळात गणपती दर्शनासाठी येणाऱ्या महिलांशी कसलेही गैरवर्तन झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मंडळाची असेल आणि कोणत्याही मंडळाने ही जबाबदारी पार पाडण्यात हलगर्जीपणा दाखवल्यास भविष्यात त्यांना परवानगी दिली जाणार नाही,' असं मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विलेपार्ले येथील भाईदास हॉलमध्ये सिंह यांच्या उपस्थितीत पश्चिम उपनगरातील गणेश मंडळांची बैठक झाली. या बैठकीत सत्यपाल सिंह यांनी गणेशोत्सवासाठी मंडळांनी केलेल्या सुरक्षा उपायांचा आढावा घेतला. तसेच मंडळांना काही सूचना दिल्या. गणपती दर्शनासाठी येणाऱ्या महिला भक्तांची छेडछाड होऊ नये, चेन स्नॅचिंगसारखे प्रकार होऊ नयेत म्हणून मंडळांनी जास्तीत जास्त खबरदारी घ्यावी. ही मंडळांची प्राथमिक जबाबदारी असेल. त्यावरच पुढील वर्षी एखाद्या मंडळाला परवानगी द्यावी की नाही हे ठरवले जाईल, असं सत्यपाल सिंह यांनी यावेळी बजावलं.
गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांवर येणारा अतिरिक्त ताण हलका व्हावा, यासाठी पोलीस आयुक्तांनी हा सुरक्षेचा भार मंडळांवर टाकला आहे. मंडळांच्या प्रतिनिधींनीही शिस्तबद्ध उत्सव साजरा करण्याचं आश्वासन दिलं आहे.

No comments:
Post a Comment