मुंबई - मुंबईमध्ये ३१ हजारांहून अधिक क्षयरुग्णांची संख्या असून त्यामध्ये पाच टक्के ही मुले आहेत. ‘आरएनटीसीपी’ कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेल्या अहवालात अडीच हजार मुलांना टीबी झाल्याचे स्पष्ट झाले असून यातील २२५ मुलांना ‘एमडीआर’ क्षयरोगाची लागण झाली असून जीन एक्स्पर्ट, एलएपी लॅब या माध्यमातून करण्यात येणार्या चाचण्यांद्वारे रोगाचे निदान वेगाने होत असल्याने ही संख्या आणखीही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुंबईमध्ये ३१ हजार ७८९ क्षय रोगाचे रुग्ण असून त्यामध्ये २ हजार ३९८ ही लहान मुले आहेत. या क्षयरुग्णांमध्ये २५०० रुग्ण हे असाध्य क्षयरोग म्हणजेच औषधांना प्रतिसाद न देणार्या एमडीआर टीबीचे आहेत. यामध्ये २२७ लहान मुले ही एमडीआर टीबीने तर पाच मुले ही एक्सडीआर टीबी म्हणजे अत्यंत जीवघेण्या क्षयरोगाने त्रस्त आहेत. राट्रीय क्षयरोग नियंत्रणाच्या सुधारित कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेल्या अहवालात मागील वर्षी क्षयरोग झालेल्या मुलांची संख्या २३०६ इतकी होती. यंदा त्यामध्ये वाढ झाली आहे. जीन एक्स्पर्ट, एलएपी लॅब यामुळे रोगाचे निदान करण्याची क्षमता वाढल्यानेच अधिकाधिक टीबी रुग्णांचे निदान होत असल्याचे आरोग्य विभागाच्या डॉ. मिनी केतरपाल यांनी सांगितले. या सर्व मुलांवर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांना सतत निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
मुंबईमध्ये असूनही गरीब वस्त्यांमध्ये राहणार्या मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण आहे. मुळात कुटुंबात कुणाला टीबी असेल तर त्याचे निदान लवकर होणे आवश्यक असते. मात्र हे टीबी असल्याचे कळेपर्यंत तो कुटुंबातील इतर सदस्यांपर्यंत पोहोचतो. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती ही कमी असल्याने त्यांना रोगाची लागण वेगाने होत असल्याचे वैद्यकीय अधिकार्याने सांगितले. सध्या हे प्रमाण ५ टक्के दिसत असले तरी मुलांमधील टीबीची संख्या १० टक्क्यांपर्यंत असल्याचे या अधिकार्याचे म्हणणे आहे.

