मध्य रेल्वेच्या बेफिकिरीने कोंकण रेल्वेवर अपघातांची मालिका सुरू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मध्य रेल्वेच्या बेफिकिरीने कोंकण रेल्वेवर अपघातांची मालिका सुरू

Share This
मुंबई - मध्य रेल्वेच्या बेफिकिरीमुळेच कोंकण रेल्वेवर २० निष्पाप जीव हकनाक गेल्याचे स्पष्ट झाले आहे. रोह्यापर्यंत हद्द असणार्‍या मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये तब्बल चार हजार मेण्टेनन्स कर्मचार्‍यांचा तुटवडा असून ही पदे भरण्यास मध्य रेल्वे प्रशासन टाळाटाळ करीत आहे. त्यातच मध्य रेल्वेचे वेळापत्रक इतके व्यस्त झाले आहे की गाड्या, रूळ व व्यवस्थेची देखभाल करण्यासही प्रशासनाला वेळ मिळत नाही. ही कामे नेमून दिलेल्या वेळेत पूर्ण होत नसल्याने ती पुढे ढकलली जात आहेत आणि त्यामुळेच अपघातांची मालिका सुरू असून मध्य रेल्वेचा कारभार रामभरोसे सुरू आहे.
लांब पल्ल्याच्या एका मेलला २० ते २४ बोेगी जोडलेल्या असतात. या २४ बोगी चेक करण्यासाठी एका गँगला मिळून सवारी आणि मालडब्बा विभागाच्या ७० कर्मचार्‍यांची कुमक लागते. एका गाडीला चेक करण्यासाठी सहा तास लागतात. नंतर इलेक्ट्रीशियन कर्मचार्‍यांचा ताफा लागतो. प्रायमरी मेन्टेनन्स झाले की सेकंडरी चेकींग होते. नंतर ऑपरेटिंगचा स्टाफ लागतो अशी माहिती नॅशनल मजदूर युनियनचे पदाधिकारी रवींद्र शिंदे यांनी दिली. माझगावच्या वॉशिंग प्लांटमधून गाड्या धुऊन स्वच्छ करून सीएसटीला आणल्या जातात. या येणार्‍या आणि सुटणार्‍या प्रवासी गाड्या अशा दोन्ही गाड्यांच्या तपासणीचा लोड कामगारांवर असतो. बर्‍याच गाड्या वाडीबंदर, एलटीटी, दादर आदी यार्डात कंत्राटी तत्त्वावर मेण्टेनन्ससाठी दिल्या गेल्या आहेत.

अपघातास सी व डी लेव्हलचे कर्मचारी कसे जबाबदार?
रेल्वेच्या सुरक्षेसंदर्भातील कारशेड, ओएचई, ट्रॅक मेण्टेनन्स आदी कर्मचार्‍यांची पदे वेळीच भरली जात नसल्याने अशा कर्मचार्‍यांच्या तुटवड्यामुळे देखभालीची कामे वेळेवर होत नाहीत. त्यामुळे अपघात झाल्यावर ग्रुप सी,डी लेव्हलच्या गरीब कर्मचार्‍याला अपघातास जबाबदार ठरवून बळीचा बकरा बनविला जात आहे. त्यामुळे या विरोधात आंदोलनाचा इशारा नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सचिव वेणू नायर यांनी दिला आहे.

केवळ ९४३ कर्मचारी सांभाळतात छत्रपती शिवाजी टर्मिनस यार्ड छत्रपती शिवाजी टर्मिनस यार्डात एकूण १२५९ कर्मचार्‍यांची पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी सध्या केवळ ९४३ कर्मचार्‍यांच्या जीवावर छत्रपती शिवाजी टर्मिनस यार्डाचे काम चालवले जात आहे. तेथे ४२६ कर्मचार्‍यांचा तुटवडा आहे. सवारी आणि डबा - १९२, ट्रेन लायटिंग (एसी कोच) -१६८, ऑपरेटिंग - ४५, मेण्टेनन्स लोको शेड इंजिन- २१ अशा ४२६ कर्मचार्‍यांची कमतरता आहे. सध्या उपलब्ध ९४३ कर्मचार्‍यांपैकी अनेक कर्मचारीं विविध नैमित्तिक रजांवर असल्याने इतर कामगारांवर ताण येऊन कामाच्या दर्जाची साफ वाट लागली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages