मुंबई : गेल्या २५ वर्षापासूनची शिवसेना भाजप युती आता जवळपास संपुष्टात आलीय. येत्या विधानसभा निवडणुकीत 'युती' म्हणून नाही तर दोन्ही पक्ष आपापले मार्ग निवडत सामोरे जाताना दिसतील, अशी चिन्हं आहेत.
जागावाटपाबाबत शिवसेनेनं दिलेला प्रस्ताव भाजपनं फेटाळलाय. भाजपला मित्रपक्षांसह ११९ जागा देण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव होता. या ११९ जागांपैकी ९ जागा भाजपनं घटकपक्षांना सोडाव्यात तर उरलेल्या १६९ पैकी ९ जागा शिवसेना घटकपक्षांना सोडेल असा प्रस्ताव शिवसेनेनं ठेवला होता. मात्र, भाजपनं हा प्रस्ताव फेटाळलाय. त्यामुळं युती तुटण्याची शक्यता वर्तवली जातेय.
भाजपनं स्वतंत्र प्रचार सुरू केल्याचं दिसतंय. भाजप अध्यक्ष अमित शाह प्रचारसभेतल्या भाषणांमध्ये काँग्रेसमुक्त भारतासोबत भाजपयुक्त महाराष्ट्राचा नारा देत आहेत. गावा-गावात जाऊन भाजप कार्यकर्त्यांचं जाळं सशक्त करण्याच्या स्पष्ट सूचना ते देत आहेत. त्यांच्या कोल्हापूर आणि चौंडीतल्या भाषणांमध्ये महायुतीचं सरकार असा कुठेही उल्लेख न करता भाजप सरकार आणा असंच ते बजावताना दिसत आहेत. त्यामुळं भाजपनं स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण केली आहे की काय? अशी चर्चांना उधाण आलंय.
दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहनी युतीच्या भवितव्याबद्दल स्पष्ट संकेत दिले आहेत. या दोन दिवसांत एकुण चार जाहिर कार्यक्रमात अमित शाह यानी युतीचा, खास करून शिवसेनेचा किंवा ठाकरे नावाचा उल्लेख पूर्णपणे टाळला. उलट भाजपच्या कामगिरीबद्दल, राज्यातील घोटाल्यांबद्दल उल्लेख करत भाजपची ‘एकला चलो रे’ अशीच वाटचाल असेल असे संकेत दिलेत असं म्हणायला जागा आहे.
उलट राज्य निवडणुक प्रभारी ओम माथुर यांच्या मार्फत जागावाटपाबाबत उद्वव ठाकरे यांच्याशी संपर्क साधत आपण स्वत: थेट बोलणार नसल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं. त्यामुले भाजप सेनेच्या दबावतंत्रापुढे झुकणार नाही हेच अमित शाह यांनी दाखवून दिल्याचं भाजप नेत्याचं म्हणणं आहे. त्यातच अमित शाह यांचा दौरा संपल्यावर काही मिनिटातच, ११९ जागांमध्ये घटक पक्षांसह तडजोड करण्याची सेनेची ऑफर धुडकावत मागे हटणार नसल्याचं भाजपने दाखवन दिलं आहे. सेना अणि भाजपाने आखलेल्या जोर बैठकांचा सपाटा लक्षात घेता पुढील काही तास हे युतीचे भवीतव्य आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत हे निश्चित.