मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या सुधार समितीच्या बैठकीकडे आज नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने बैठक रद्द करण्यात आली. पालिकेतील सुधार व शिक्षण या दोन समित्या भाजपाकडे आहेत. या समितीच्या अध्यक्षपदी उज्वला मोडक तर विनोद शेलार आहेत. महायुती तुटल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेणार हे स्पष्ट केल्यानंतर समितीच्या बैठकांवर परिणाम होईल हे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते.
महायुती तुटल्यावर प्रथमच होणार्या सुधार समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु समितीच्या अध्यक्ष उज्वला मोडक या बैठकीत गैरहजर राहिल्या . या बैठकीला शिवसेनेच्या आश्विनी मते , मानसी दळवी, भाजपच्या जयश्री पालांडे, आखिल भारतीय सेनेच्या वंदना गवळी , कॉंग्रेसच्या जोत्स्ना दिघे, गीता यादव व राष्ट्र वादीच्या संध्या जोशी यांनीच हजेरी लावली . परंतु बैठकीचा कोरम पूर्ण न झाल्याने आश्विनी मते यांनी बैठक रद्द केल्याचे जाहीर केले . समितीच्या अध्यक्ष व इतर सदस्य असलेले नगर सेवक विधान सभेचे फॉर्म भरण्यात व्यस्त असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत असे सांगण्यात येत असले तरी महायुती तुटल्यानंतर भाजपने पालीकेमधून शिवसेनेशी फारकत घेण्यासही सुरवात केल्याचे बोलले जात आहे.