उधळपट्टीवर निवडणूक आयोगाचा वॉच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 September 2014

उधळपट्टीवर निवडणूक आयोगाचा वॉच

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून विविध आमिषे दाखवली जातील. उमेदवारांच्या या उधळपट्टीवर निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे. उमेदवाराकडून निवडणूक खर्च आणि आचारसंहितेचे पालन होते का यावर देखरेख ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने भरारी पथक आणि निरीक्षण गटांचा समावेश असलेल्या सुमारे १८00 गटांची स्थापना केली आहे. 

मुंबई, पुणे, नाशिक आणि ठाणे ही शहरे निवडणुकांदरम्यान संवेदनशील समजली जातात. त्यामुळे निवडणुकीदरम्यान परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी इतर राज्यांतील आयपीएस अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात येणार आहे. राज्यातील दोन नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये तसेच मतदान कक्षांची संख्या सर्वाधिक असलेल्या इतर संवेदनशील जिल्ह्यांत सहा पोलीस अधिकार्‍यांची निरीक्षक म्हणून आयोगाने नेमणूक केली आहे. निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आयएएस दर्जाचे ११२ अधिंकार्‍यांचीही निवडणूक आयोगाने नेमणूक केली आहे. 

'चालू वर्षी एप्रिल-मे महिन्यांत झालेल्या लोकसभा निवडणुकांत खर्चावर देखरेख करणारी यंत्रणा प्रथमच राबवण्यात आली. आचारसंहितेचे पालन आणि निवडणूक खर्च यावर वॉच ठेवण्यासाठी १ हजार ७४३ भरारी आणि स्थितीक पथके उभारण्यात आली आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकांत प्रत्येक मतदारसंघात तीन भरारी आणि तीन स्थितीक पथके उभारण्यात आली आहेत. त्यामुळे लोकसभेपेक्षा यंदा या पथकांची संख्या अधिक आहे,' असे निवडणूक अधिकार्‍यांनी सागितले. तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी निमलष्करी दलाच्या ३५ तुकड्या तैनात ठेवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. यामध्ये केंद्रीय राखीव रेल्वे बलाच्या १२ तुकड्या, रेल्वे पोलीस बलाच्या ८ तुकड्या आणि गोवा राज्य राखीव पोलीस दलाच्या ५, तर उर्वरित राज्य राखीव पोलीस दलातील तुकड्यांचा समावेश असणार आहे.

Post Bottom Ad