अजितदादा म्हणाले, आता आमची सटकली..! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 September 2014

अजितदादा म्हणाले, आता आमची सटकली..!

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापुरातून विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराचा बिगुल वाजवला आहे. राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी भाषणातून केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तर, आता आमची सटकली, मला राग येतोय..! अशा शब्दांत विरोधकांना आव्हान दिले आहे. तर शरद पवार यांनी केंद्रातील सरकार केवळ धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.
प्रचार सभेमध्ये सुरुवातीला छगन भुजबळ यांनी मते मांडली. आघाडी सरकारने नेहमीच जनतेच्या हिताचेच निर्णय घेतलेले आहेत. मराठा आरक्षण, मुस्लीम आरक्षण हे विचार जनतेच्या भावना आणि विचारांचा आदर करत घेतलेले आहेत. त्यामुळे आघाडी सरकारचे निर्णय कोणालाही बदलता येणार नाही, अशा भाषेत छगन भुजबळ यांनी विरोधकांना आव्हान दिले.

भुजबळांनंतर अजित पवारांनीही सुरुवात मोदी सरकारवर हल्ला करतच केली. लोकसभेतील पराभवाने खचून जावू नका. केंद्रातील मोदी सरकार मोठी स्वप्ने दाखवून सत्तेत आले पण लोकांचे प्रश्न सोडवण्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे, असे अजित दादा म्हणाले. केंद्र सरकारने उस उत्पादकाकडे दुर्लक्ष केले आहे. लाखो पोते साखर कारखान्यात पडून असताना साखरेबाबत धोरण ठरवले जात नाही. शरद पवार कृषीमंत्री असताना देशभरातील बळीराजा सुखात होता, असा दावाही अजित पवारांनी केला आहे. पुन्हा सत्तेत आल्यानंतर शंभर दिवसांत कोल्हापूरसह राज्यभरातील टोल बंद करून दाखवणार असल्याचे आश्वासन अझित दादांनी यावेळी दिले.
दरम्यान यावेळी अजित पवार विनोद तावडेंवर चांगलेच घसरले. 'हा पठ्ठ्या गेल्या काही दिवसांपासून काहीही बरळत आहे. हा कधी विधानसभेवर निवडून आला नाही. मग लोकांचे प्रश्न काय मांडणार. आर.आर.पाटलांचे भाषण ऐकल्यानंतर, आता माझी सटकली, मला राग येतोय..मला राग..! अशा शब्दांत अजित पवारांनी आपल्या भावना मांडल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्र सरकार देशातील नागरिकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. संसदेमध्ये येऊन बसलेले अनेक खासदार याच कामात लक्ष देऊन आहेत. या देशाच्या सामाजिक ऐक्याला तडा पोहोचवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. धर्म संसदेच्या माध्यमातून ते जनतेला आरोपीच्या पिंज-यात उभे करत आहेत. याच धर्मसंसदेने ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी महाराजांनाही पिंज-यात उभे केले. पण त्यांना अधिकार कोणी दिला. आम्ही केवळ लोकशाहीच्या संसदेला मानतो. त्यामुळे महाराष्ट्र अशा प्रकारच्या सांप्रदायिक विचारांना थारा देणार नाही, असे शरद पवार म्हणाले. राज्य देशाचा कारभार व्यवस्थित चालायला हवा. स्त्री पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादीला बळ देणे गरजेचे आहे, असेही शरद पवार म्हणाले.
विधानसभा पोटनिवडणुकीवरून भाजपबाबत जनतेमध्ये असलेली निराशा समोर आली आहे. तीन महिन्यात लोकांना विचार करावा लागत असेल, तर महाराष्ट्रात तशी वेळ येता कामा नये. पक्षातून गेलेल्यांचा विचार करू नका. त्यांना त्याठिकाणीही काही हाती लागणार नाही याचा विश्वास आहे. राज्यातील कोणताही जिल्हा असो त्याठिकाणी नवी पिढी राष्ट्रवादीकडे झुकत आहे. त्यांना आशिर्वाद देण्याचे काम मतदारांना निवडणुकीच्या माध्यमातून करायचे आहे. महिलांना अधिकाधिक संधी देऊ, चेहरा बदलायची गरज असेल तेथे तसा निर्णय घेऊ असे आश्वासन पवार यांनी दिले.

अजितदादा म्हणाले, आता आमची सटकली..! राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत केंद्रावर हल्लाबोल

Post Bottom Ad