भाजपचे १७, सेनेचे १५ आमदार दहावी पास - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 October 2014

भाजपचे १७, सेनेचे १५ आमदार दहावी पास

मुंबई - राज्याच्या नव्या कायदेमंडळात २८८ पैकी तब्बल ४६ आमदार जेमतेम दहावीपर्यंत शिकलेले असून त्यात भाजपचे १७, शिवसेनेचे १५, राष्ट्रवादीचे ९ आणि काँग्रेसच्या ३ आमदारांचा समावेश आहे. सर्वाधिक पदवीधर आमदारही भाजपचेच असून त्या खालोखाल शिवसेनेचा क्रमांक लागतो. 
लोकप्रतिनिधी होण्यासाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही. परंतु, जनतेचे प्रश्न तडीस नेण्यासाठी वैधाविधा मार्गांचा प्रभावी वापर लोकप्रतिनिधींना करता यावा लागतो. उच्च शिक्षण घेतलेले लोकप्रतिनिधी सभागृहात बाजी मारतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळेच उच्चशिक्षित आमदार देण्याकडे प्रत्येक पक्षाचा कल असतो.

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संघटनेने केलेल्या अभ्यास अहवालानुसार राज्याच्या पंधराव्या विधानसभेतील लोकप्रतिनिधी मात्र शिक्षणात बरेच मागे असल्याचे दिसते. शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक काम करणारे अनेक महात्मा फुले,  गोपाळ गणेश आगरकर, बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज यांच्यासारखे थोर समाजसुधारक ज्या महाराष्ट्रात झाले त्या राज्यात आजही सुमारे ५० आमदार हे दहावी शिकलेले असावे आणि केवळ निम्मेच आमदार पदवीधर असावेत हे चिंताजनकच चित्र म्हणावे लागेल.
 
तीन अामदार अल्पशिक्षित, तर सात पी.एचडी. प्राप्त नव्या विधानसभेतील तीन आमदारांना केवळ अक्षरओळख असून ते पहिलीसुद्धा पास नाहीत. आठ आमदार जेमतेम पाचवीपर्यंत मजल मारलेले आहेत. तर १५ आमदार आठवी पास आहेत. केवळ पाचवी उत्तीर्ण झालेले भाजपचे पाच तर काँग्रेसचे दोन आमदार आहेत. तर अाठवी उत्तीर्ण झालेल्या एकूण १५ आमदारांपैकी पाच आमदार हे भाजपचे, शिवसेनेचे चार, काँग्रेसचे तीन आमदार आहेत.  ४६ आमदार दहावी पास असून ५४ आमदार १२ वी उत्तीर्ण आहेत. ७० आमदार पदवीधर असून ४९ आमदार व्यावसायिक पदवीधर आहेत. २८ आमदार द्विपदवीधर असून सात आमदार शिक्षणातील पीएच.डी. पदवी प्राप्त केलेले आहेत, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे.

शैक्षणिक चित्र
पंधराव्या विधानसभेत केवळ अक्षरओळख असलेले तीन आमदार आहेत. त्याखालोखाल पाचवी-८, आठवी-१५, दहावी-४६, बारावी-५४, पदवीधर-७०, व्यावसाियक पदवीधर-४९, द्विपदवीधर-२८, पीएच.डी.-७, इतर-८ असा पंधराव्या  विधानभेतील २८८ सदस्यांचा शैक्षणिक आलेख आहे.

भाजप सर्वात पुढे
अल्पशिक्षित आणि उच्चशिक्षित आमदार देण्यात भाजपची आघाडी आहे. १२२ पैकी भाजपने ५ पीएच.डी., १४ द्विपदवीधर, २० व्यावसायिक पदवीधर, ३३ पदवीधर, १८ बारावी, १७ दहावी, ५ आठवी, ५ पाचवी आणि अक्षरओळख असलेला एक आमदार दिला आहे.

Post Bottom Ad