निवृत्तिवेतनासाठी फेऱ्या मारून पालिकेच्या शिक्षिकेला हृदयविकाराचा झटका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

निवृत्तिवेतनासाठी फेऱ्या मारून पालिकेच्या शिक्षिकेला हृदयविकाराचा झटका

Share This
मुंबई - शिक्षण विभागाचा भावनाशून्य कारभार शिक्षण समिती सदस्यांनी चव्हाट्यावर आणला. मुलुंड येथील एका खासगी शाळेतील शिक्षिकेला निवृत्तिवेतनासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागात फेऱ्या मारून हृदयविकाराचा झटका आला. असाच प्रकार शहरातील आणखी एका शिक्षिकेबरोबर घडला, तर अंधेरी येथील एका शिक्षिकेला अपघातात पाय गमवावा लागला. शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी खासगी शाळांमधील निवृत्त शिक्षकांचा मुद्दा उपस्थित केला. 
कुर्ला-बैलबाजार येथील खासगी शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिकेला शाळेने लाईट बिल भरले नाही म्हणून निवृत्तिवेतन नाकारण्यात आले. मुलुंड येथील एका शिक्षिकेला हयातीत निवृत्तिवेतन मिळाले नाही; मात्र तिच्या मृत्यूनंतर निवृत्तिवेतन मंजूर करण्यासाठी अधिकारी त्यांच्या वारसांचा शोध घेत आहेत. खासगी शाळांमधील निवृत्त शिक्षकांच्या अशा अनेक व्यथा सदस्यांनी मांडल्या. प्रशासनाच्या संवेदनशून्य कारभारावर टीकाही करण्यात आली.

अध्यक्ष विनोद शेलार यांनी त्यांना आलेली काही पत्रे वाचून दाखवली. वीणा गौर या निवृत्त शिक्षिकेला निवृत्तिवेतनासाठी खेटा मारून हृदयविकाराचा झटका आला. अंधेरी येथील माधवी जाधव या शिक्षिकेला अपघातात पाय गमवावा लागला. या घटनांनंतरही प्रशासनाला जाग आली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

या चर्चेला उत्तर देताना निवृत्तिवेतन वितरणाबाबत नवे धोरण तयार करण्यात आले असून, त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. लवकरच हा प्रस्ताव शिक्षण समितीसमोर मांडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले, तर निवृत्तिवेतनात आर्थिक अडचणी असतील, तर त्यावर तत्काळ निर्णय होऊ शकत नाही; मात्र थातुरमातुर कारणांसाठी निवृत्तिवेतन रखडविणे चुकीचे असल्याचे अध्यक्षांनी नमूद केले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages