बंदोबस्तावरील १ हजार पोलीस अधिकार्‍यांनी केले पोस्टाद्वारे मतदान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बंदोबस्तावरील १ हजार पोलीस अधिकार्‍यांनी केले पोस्टाद्वारे मतदान

Share This
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी होणार असल्याने त्या दिवशी बंदोबस्ताच्या कामात व्यस्त असणार्‍या सुमारे एक हजार पोलीस अधिकार्‍यांनी सोमवारीच पोस्टाद्वारे आपले मतदान केले. मतदानाच्या दिवशी बंदोबस्ताच्या कामात व्यस्त असणार्‍या पोलीस अधिकारी व इतर कर्मचार्‍यांसाठी पोस्टाने मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने केली आहे. कामामुळे ज्यांना आपल्या मतदान केंद्रात जाऊन मतदान करणे शक्य नाही अशा अधिकार्‍यांना पोस्टाद्वारे मतदान करण्यासाठी १२ ऑक्टोबरच्या आधी निवडणूक कार्यालयात एक अर्ज भरून द्यावा लागतो. 

या अर्जाच्या आधारे निवडणूक कार्यालय या अधिकार्‍यांच्या घरी दोन सीलबंद लिफाफे पाठवते. एका लिफाफ्यात मतपत्रिका असते, तर दुसर्‍यात स्वाक्षरीचा अर्ज असतो. आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या निशाणीवर फुली मारून ही मतपत्रिका सीलबंद लिफाफ्याद्वारे त्या त्या विभागातील पोस्ट ऑफिसरच्या सहीने निवडणूक आयोगाकडे पाठवली जाते. निवडणूक अधिकारी मतदार असलेल्या पोलीस अधिकार्‍याच्या स्वाक्षरीची तपासणी करून ती मतपत्रिका ग्राह्य धरतात. १८ ऑक्टोबरला सकाळी आठ वाजेपर्यंत आलेल्या पोस्टल मतपत्रिका स्वीकारल्या जातात. त्यानंतर आलेल्या मतपत्रिकांचा स्वीकार केला जात नाही. आपण मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये म्हणून जागृत असलेल्या एका हजार पोलिसांनी पोस्टाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला. त्याचे अनुकरण इतर मतदारांनी करावे. तसे झाल्यास मतदानाची टक्केवारी निश्‍चित वाढेल, याची शक्यता आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages