शिवसेना- भाजपची युती आता कधीच शक्य नाही - संजय राऊत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिवसेना- भाजपची युती आता कधीच शक्य नाही - संजय राऊत

Share This
शिवसेना- भाजपची युती आता कधीच शक्य नाही- खासदार संजय राऊत
मुंबई - गेल्या 25 वर्षापासून असलेली शिवसेना-भाजपची युती भारतीय जनता पक्षाने का तोडली याचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत पुन्हा युती होणे शक्य नाही. सत्तेसाठी हापपलेल्या भाजपला युती तोडल्यानंतर आता वास्तवाचे भान आले आहे. त्यामुळे गरज पडल्यास सेनेशी पुन्हा युती करू असे ते सांगत आहेत पण राज्यातील जनता युती तोडणा-यांना आता भांडी घासायला लावणार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर काही जागा कमी पडल्यास शिवसेनेची मदत घेऊ शकतो, असे भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्यानंतर महायुतीतील घटकपक्ष असलेले आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनीही निकालानंतर शिवसेनेला महायुतीत पुन्हा सामील करून घेण्याचा प्रयत्न करू असे म्हटले होते. त्यावर खासदार राऊत यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. खासदार संजय राऊत सध्या रत्नागिरी जिल्ह्यात प्रचार दौ-यावर आहेत. रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारासाठी ते आले आहेत. त्यावेळी राऊत यांना पत्रकारांनी छेडले. त्यावेळी राऊत यांनी भाजपसोबत पुन्हा युती करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे म्हटले आहे.

राऊत म्हणाले, भाजपला लोकसभेत जोरदार यश मिळाल्यानंतर त्या पक्षाच्या नेत्यांत डोक्यात चांगलीच हवा गेली. त्यामुळे भाजपला मित्रपक्षच नको वाटू लागले. दिल्लीतील भाजपचे काही नेते अफजलखानी विडा उचलून युती तोडण्याच्या उद्देशाने मुंबईत आले होते. त्यांच्यामुळे मागील 25 वर्षापासूनच हिंदुत्त्वाच्या आधारावर असलेली युती तुटली. भाजप-शिवसेनेची फक्त राजकीय युतीच तुटली नाही तर आता एकमेंकांची मनेही तुटली आहेत. म्हणूनच शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणे नाही असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

स्वतंत्र लढले तर स्वबळावर सत्ता मिळवू, अशी स्वप्ने पाहणा-या भाजप नेत्यांना शिवसेनेसोबतची युती तोडल्यानंतर वास्तव कळू लागले आहे. त्यामुळेच ते आता पुन्हा शिवसेनेशी युतीबाबत बोलू लागले आहेत. शिवसेनेशिवाय भाजपची सत्ता येणे केवळ अशक्य आहे. याची जाणीव झाल्यानेच भाजप नेते आता सैरबैर झाले आहेत. पण शिवसेना भाजपसोबत आता जाणार नाही. युती का तोडली याचे कारण जोपर्यंत दिले जात नाही तोपर्यंत चर्चाही होऊ देणार नाही. युती तर लांबची गोष्ट आहे. युती कोणामुळे तुटली हे महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला माहित आहे. त्यामुळे युती तोडणाऱ्यांना महाराष्ट्रात भांडी घासायची वेळ आणू अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages