पावसाचे पाणी साठवण्याचे धोरण तयार करण्याचा पालिकेचा विचार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पावसाचे पाणी साठवण्याचे धोरण तयार करण्याचा पालिकेचा विचार

Share This
मुंबई - मुंबईत धो-धो पाऊस कोसळत असला आणि पाणी साचून रहिवाशांचे हाल होत असले तरी पावसाचे अफाट पाणी साठविण्याची कोणतीही व्यवस्था शहरात नाही. परिणामी मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊनही शहरवासीयांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाणीकपातीची टांगती तलवारही त्यांच्यावर असते; परंतु आता मुंबई पाणीटंचाईमुक्त करण्याचा निर्णय पालिकेने केला आहे. पावसाचे पाणी साठवण्याचे धोरण तयार करण्याचा पालिकेचा विचार आहे. त्याबाबतच्या ठरावाच्या सूचनेला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. 
मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात पाण्याची तीव्र टंचाई प्रकर्षाने जाणवते. मुंबईला पाणी पुरविणाऱ्या सात तलावांतील जलसाठ्यांवर नागरिकांना वर्षभर अवलंबून राहावे लागते. रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना बंधनकारक करूनही त्याची म्हणावी तशी अंमलबजावणी होत नाही. गृहनिर्माण संस्था रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. मुंबईतील गृहनिर्माण संस्था, सरकारी इमारतींच्या विस्तीर्ण गच्ची, उड्डाणपूल आणि रस्त्यांवरून वाहून जाणारे पाणी साठविण्याची कोणतीही व्यवस्था नाही. हे पाणी एकत्र करून साठविण्याबाबत नगरसेविका समिता नाईक यांनी ठरावाची सूचना मांडली आहे. 

जलसंचय आणि विनियोगासाठी पालिकेने धोरण तयार करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, आयआयटी किंवा तत्सम अभियांत्रिकी शिक्षण संस्थांची मदत घेऊन, पावसाचे वाया जाणारे पाणी साठवण्याबाबत धोरण तयार करण्याचा पालिकेचा विचार आहे. पालिकेच्या पुढील सभेत याबाबतच्या ठरावाची सूचना मांडण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages