मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दुकाने, कार्यालये, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, रिटेल्स आदी आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश बजावूनही ती चालू ठेवल्याप्रकरणी महापालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाने शहरातील १५० दुकाने, कार्यालयांना नोटिस बजावली आहे.
मतदानाच्या दिवशी दुकाने, कार्यालये व हॉटेल बंद ठेवून त्यांना पगारी सुट्टी देण्याचे परिपत्रक सरकारने जाहीर केल्यानंतर, महापालिकेच्या वतीने सर्वाना मतदानापूर्वी सूचना देण्यात आल्या. परंतु प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अनेक आस्थापनांमध्ये कामगारांना सुट्टी न देता ती चालूच ठेवल्याचे आढळून आले. कुलाबा ते लालबाग परिसरातील ५६ दुकाने, निवासी हॉटेल्स आणि औद्योगिक कंपन्या आदी चालू असल्याचे आढळून आल्याने त्यांना दुकाने व आस्थापना विभागामार्फत नोटिस बजावण्यात आली.
यामध्ये नरिमन पॉइंट इक्विटी कंपनी तर वेस्टीड या हॉटेलसह ५६ जणांना नोटिस बजावून त्या सर्वावर न्यायालयाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तर परळ ते माहीम-धारावी विभागातील ९५ दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, मॉल्सवर कारवाई करण्यात आली. या नोटिसनंतर अनेक कार्यालये व आस्थापने बंद करण्यात आली. मात्र, मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबत जनजागृती करण्यात आल्यामुळे बहुतांश कार्यालये, आस्थापने व दुकाने बंद होती, असे अधिका-यांचे म्हणणे होते.