आजपासून सहा दिवस बँका बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 October 2014

आजपासून सहा दिवस बँका बंद

मुंबई : आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीची अखेर, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, विजयादशमी, सार्वजनिक सुट्टय़ा अन् बकरी ईद यामुळे बुधवारपासून सलग सहा दिवस बँकांचे व्यवहार बंद राहणार आहेत. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून ६ तारखेपर्यंत म्हणजे सलग सहा दिवसांच्या सुट्टीमुळे एटीएममध्येही पैशांचा खडखडाट होण्याची शक्यता असून सामान्यांची मोठय़ा प्रमाणावर गैरसोय होणार आहे. 

बुधवार, १ ऑक्टोबर रोजी सहामाही क्लोजिंगचा आहे. बँकांचे कर्मचारी कामावर असतील पण बँका उघड्या असूनही या वेळी बँकाचा लेखाजोखा घेण्याचे काम सुरू असणार आहे. या कालावधीत ग्राहकांसाठी सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त, तर शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी दसर्‍यानिमित्त सुट्टी असेल. ४ ऑक्टोबर रोजी शनिवार असल्याने बँकांमध्ये केवळ अर्धा दिवस काम चालेल, तर काही बँकांना शनिवारची सुट्टी असते. 

५ ऑक्टोबर रोजी रविवारची साप्ताहिक सुट्टी असेल. रविवारी बकरी ईद आहे. ती सुट्टी सोमवारी जाहीर करण्यात आली आहे. अशा पद्धतीने सर्वच ठिकाणी सहा दिवस बँका बंद राहणार आहेत. त्याचा परिणाम एटीएमवरही होणार आहे. बँकांच्या सुट्टय़ांमध्ये ग्राहकांची मदार एटीएमवर असते. एकीकडे दसर्‍याच्या मुहूर्तावर सोने-चांदीपासून अनेक वस्तूंची खरेदी मोठय़ा प्रमाणावर होते. अशा वेळी बँका सलग बंद आणि एटीएममध्येही खडखडाट झाल्यास ग्राहकांना मोठय़ा प्रमाणावर गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.

Post Bottom Ad