यशवंतराव विद्यापीठाची पुस्तके ऑनलाइन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 October 2014

यशवंतराव विद्यापीठाची पुस्तके ऑनलाइन

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पुस्तके देण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या या निर्णयाचा फायदा राज्यभरातील सुमारे ३ लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. विद्यापीठाच्या बीए, बीकॉमसह इतर अनेक अभ्यासक्रमासाठी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 
विविध कारणांमुळे उच्चशिक्षणाचे स्वप्न अर्धवट राहिलेले तसेच नोकरी करून शिक्षण घेणारे अनेक जण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतात. पण प्रवेश घेतल्यानंतर देण्यात येणारी पुस्तकेच अनेकदा त्यांना मिळत नाही. त्यावर अखेर तंत्रज्ञानाचा उतारा शोधण्यात आला आहे. इंटरनेटद्वारे अध्ययन साहित्य विद्यार्थ्यांना घरबसल्या विनामुल्य देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या निर्णयासाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी पुढाकार घेतला होता. विविध अभ्यासक्रमांची पुस्तके वेबसाइटवर अपलोड करण्यात आली असल्याची माहिती विद्यापीठातर्फे देण्यात आली आहे.

या निर्णयानुसार विद्यापीठाच्या वेबसाइटवर कृषी विज्ञान विद्याशाखेची ७२ पुस्तके, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा ९२, संगणकशास्त्र विद्याशाखा ३२, शिक्षणशास्त्र १, आरोग्य विज्ञान विद्याशाखा ३, मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे २५६, शैक्षणिक सेवा विभाग ८ आणि सहयोग व विशेष उपक्रम केंद्राची ६ अशाप्रकारे एकूण ४७० पुस्तकेwww.ycmou.ac.in या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहेत. शहरी भागाबरोबरच ग्रामीण, अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयाचे पुस्तक दोन ते अडीच मिनिटांत सहजरित्या डाउनलोड करता येते. Tab किंवा मोबाइलवरही ही पुस्तके वाचता येतील. या उपक्रमासाठी विद्यापीठाच्या वास्तुकला, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. मनोज किल्लेदार यांनी पुढाकार घेतला होता.

Post Bottom Ad