राज ठाकरेंना जनतेनं नाकारलं - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज ठाकरेंना जनतेनं नाकारलं

Share This
मनसेची सत्ता आल्यानंतर काम करू शकलो नाही तर 'राजकीय दुकान' बंद करेन, अशी कोटी करणाऱ्या राज ठाकरे यांना जनतेने नाकारले आहे. मनसेला सत्ता देण्याचे सोडाच; त्यांच्या दुकानाकडे मतदार फिरकलेच नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारणाऱ्या मनसेची या निवडणुकीत अक्षरश: वाताहात झाली आहे. सव्वा दोनशेपेक्षा अधिक जागा लढविणाऱ्या मनसेला दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही. 

२००९च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या करिष्म्याच्या जोरावर मनसेने पहिल्याच प्रयत्नात १३ जागा पटकावल्या होत्या, तर ५०हून अधिक जागांवर कडवी लढत देत दुसरा क्रमांक पटकावला होता. या निकालामुळे मनसे हा राज्यातील एक प्रमुख पक्ष म्हणून पुढे आला. मात्र, त्यानंतरच्या पाच वर्षांत राज ठाकरे यांनी घेतलेल्या अनाकलनीय भूमिका, लोकसभेत नरेंद्र मोदी यांना दिलेला पाठिंबा व नाशिक महापालिकेतील निष्क्रीय कारभारामुळे मनसेचा प्रभाव पूर्णपणे ओसरला होता.

गेली सहा वर्षे रखडलेली ब्ल्यू प्रिंट निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध करून राज ठाकरे यांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनसेच्या आश्वासनांना वैतागलेल्या जनतेने ब्ल्यू प्रिंटकडे ढुंकूनही पाहिले नाही. निवडणूकपूर्व जनमत चाचण्यांनीही मनसेला दोन अंकी संख्याही गाठता येणार नसल्याचे भाकीत वर्तवले होते. ते खरे ठरले. मुंबईतील मनसेचे आमदार प्रवीण दरेकर, नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, मंगेश सांगळे यांचा पराभव झाला. तर नाशिकमध्ये तिन्ही आमदार पडले. पुण्यातील जुन्नर येथे शरद सोनवणे यांच्या विजयामुळे मनसेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages