चिपळूण- बौद्ध संस्कृती वेगवेगळ्या लेण्यांमधून स्तुपांमधून आपणास पहावयास मिळाते. अशी लेणी चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी गावातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सापडली आहे. चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील बौद्धलेणी, बुद्धाच्या मूर्ती तसेच चैत्यगृहे अद्याप दुर्लक्षितच आहेत. याकडे पुरातत्त्व खाते दुर्लक्ष करीत असल्याने परिसरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या लेण्या सह्याद्री पर्वतरांगामध्ये होत्या, हे कुणास ठाऊक नव्हते. काही गावक-यांना याची अल्पशी माहिती होती. मात्र, त्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याची व तेथपर्यंत जाण्याची तसदी कुणीही घेतली नाही. मात्र, २००४ साली बौद्ध संस्कृतीशी बांधिलकी बाळगणा-या काही तरुणांनी या कामात पुढाकार घेतला. चिपळूण शहरातील बौद्ध कॉलनीतील १० तरुणांनी सह्याद्रीवर जाताना आलेल्या अडचणींवर मात करीत ही लेणी गाठली आणि उजेडात आणली. या तरुण मंडळींनी पुढे आणलेल्या माहितीनुसार २५०० फूट उंचीवरील या पर्वतात काळया दगडात अनेक चैत्यगृहे खोदलेली आहेत.
याठिकाणी १२ चैत्यगृहे आहेत. त्यापैकी काही याठिकाणांवरून दिसतात. मात्र, तेथवर पोहोचता येत नाही. कारण ती अगदी पर्वताच्या तंदूर किना-यावर आहेत. या चैत्यगृहात पुरुषभर उंचीचे सभागृह असून वरील बाजूस दोन खुली द्वारे आहेत. या दोन द्वारांसमोरील भिंतीवर नक्षीकाम केलेले आहे. चैत्यगृहाचा आतील भाग गाडला गेला आहे. डोंगरात त्याच्या नेमक्या विरुद्ध बाजूस दुसरे चैत्यगृह आहे. त्याची उंची सहा फूट आहे. ते पाण्याने भरलेले असून त्यात तुटलेल्या अवस्थेतील नक्षीदार स्तंभ आहेत. त्याच बाजूने गेल्यावर तिसरे चैत्यगृह लागते. यात बैठकीचा चबुतरा आहे. या चैत्यगृहाचे वैशिष्टय़ म्हणजे आतमध्ये प्रकाश येण्यासाठी एक झरोका आहे. हा बाहेरून दिसत नाही. मात्र, त्यातून पावसाचे पाणी आतमध्ये येऊ शकत नाही, अशी त्यांची व्यवस्था केलेली आहे. झरोक्यातून येणारा सूर्यप्रकाश आतमध्ये सर्वत्र पसरतो हे विशेष!
चौथ्या चैत्यगृहात केवळ पाणी आहे. त्यानंतर पर्वत चढून गेल्यावर सपाट माळ लागतो. याठिकाणी शिल्पकलेची साक्ष पटवणा-या मूर्ती आढळून येतात. पूर्वीच्या काळातील मातीच्या भांडयाचे अवशेषही येथे आढळतात. तसेच येथे एक गुहा अशी आहे की, तेथून बारमाही पाणी कायम वाहत असते. एवढया उंचीवर पाणी असणे हे वैशिष्टयच म्हणावे लागेल. पुरातत्व विभागाने या लेण्यांचे शास्त्रशुद्ध संशोधन करून ती प्रकाशात आणण्याची गरज आहे. याविषयी अभ्यास होणे आवश्यक आहे. तरच त्या काळची संस्कृती निश्चितच जगापुढे येईल, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.