एक महिना उपोषण करूनही सरकारचे दुर्लक्ष
मुंबई / अजेयकुमार जाधव
नवी मुंबई येथील रेयान इंटरन्याशनल शाळेमधील सुपरवायझरने भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केला. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची तक्रार केली म्हणून याच शाळेतील शिपाई असलेया योगेश वीरकर नामक यांना नोकरीवरून निलंबित करण्यात आले आहे. आपल्याला न्याय मिळावा यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात वीरकर यांनी गेले एक महिने उपोषण सुरु ठेवले असले तरी उपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने वीरकर यांना अद्याप न्याय मिळालेला नाही.
नवी मुंबईच्या इंटरन्याशनल शाळेमध्ये वीरकर गेले आठ वर्षे शिपाई म्हणून काम करत आहेत. परंतू या कालावधीत त्यांना अपमानस्पद वागणूक, अयोग्य मोबदला व सोयी सुविधा देण्यात येत आहे. १२ ऑगस्ट रोजी शाळेतील सुपरवायजर राजश्री राजे यांनी भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केला. याप्रकरणी वीरकर यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली होती. यानंतर १३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायद्यानुसार खांदा कॉलोनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. त्याचा बदला घेण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी वीरकर यांना नोकरीवरून निलंबित केले आहे. निलंबित केल्याचे पत्र घेण्यास वीरकर यांनी नकार दिल्याने शाळेमध्ये पोलिसांना बोलावून निलंबन पत्र घेण्यास वीरकर यांना भाग पडले आहे.
आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत वीरकर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव, कामगार मंत्री, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती पनवेल यांना १२ सप्टेंबर २०१४ रोजी निवेदन दिले आहे. निवेदन देवूनही न्याय मिळत नसल्याने १२ ऑक्टोंबर पासून मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु केले आहे. बेमुदत उपोषणाला एक महिना झाला तरी अद्याप सरकारकडून न्याय मिळाला नसल्याचे वीरकर यांनी सांगितले आहे.
