आरक्षणाविषयीच्या रागातूनच दलितांची हत्या - डॉ. भालचंद्र मुणगेकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आरक्षणाविषयीच्या रागातूनच दलितांची हत्या - डॉ. भालचंद्र मुणगेकर

Share This
अंधेरी - दलितांना नोकऱ्यांमध्ये देण्यात येणाऱ्या आरक्षणाविषयी राग असल्यानेच महाराष्ट्रात दलितांच्या हत्याकांडाच्या घटना घडत आहेत, असे मत खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी नोंदवले. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्‍यातील जवखेडा येथे दलित कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई विद्यापीठात "डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल ऍण्ड इकॉनॉमिक चेंज‘ या संस्थेतर्फे जे. पी. नाईक भवनात दलित अत्याचारविरोधी चर्चासत्र नुकतेच झाले. या वेळी डॉ. मुणगेकर बोलत होते. 

दलितांवरील अत्याचार रोखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. खैरलांजी हत्याकांड ही महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वाधिक भयंकर घटना आहे. "निर्भया‘सारखी प्रकरणे घडतात तेव्हा संपूर्ण समाज त्या घटनेविरोधात उभा राहतो आणि मेणबत्ती मोर्चा काढतो; पण दलितांवर अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा फक्त दलित समाज निषेधासाठी पुढे येतो, अशा शब्दांत मुणगेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांत दलितांची एकजूट आहे. महाराष्ट्रात मात्र अत्याचारांविरोधात एकत्रित चळवळ राबवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

जवखेडासारखी प्रकरणे भविष्यात घडू नयेत म्हणून विविध स्तरांवर काय करता येईल, याबाबत विचार करण्यासाठी हे चर्चासत्र घेण्यात आले. विद्यापीठातील प्राचार्य, पत्रकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी चर्चासत्रात सहभागी होऊन जवखेडा हत्याकांडाचा तीव्र शब्दांत निषेध केला. ग्रामीण भागात दलितांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ होत असल्याबद्दल चर्चासत्रात चिंता व्यक्त करण्यात आली. आंबेडकरी चळवळ योग्य दिशेने वाटचाल करीत नसल्यानेच असे प्रकार घडत आहेत, असे स्पष्ट करून वक्‍त्यांनी मागासवर्गीयांचे सर्व पक्ष व संघटनांना दोष दिला.

दलितांवरील अत्याचारप्रकरणी गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी त्याबाबतच्या खटल्याचा पाठपुरावा करणारा गट तयार करण्याची गरज आहे, असे ज्येष्ठ पत्रकार सुधाकर कश्‍यप म्हणाले. सर्व आंबेडकरी अनुयायांनी एकत्र येऊन अत्याचारांविरोधात लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages