आधी पैसे भरा नंतरच लोकलने प्रवास करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आधी पैसे भरा नंतरच लोकलने प्रवास करा

Share This
मुंबई : उपनगरीय रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांना घरबसल्या आपले तिकीट मोबाईलद्वारे काढण्याची योजना डिसेंबरपर्यंत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य (वाहतूक) देवीप्रसाद पांडे यांनी दिली. प्रवाशांना 'आर-वॉलेट' नावाने हे मोबाईल अँप्लिकेशन कार्यरत करावे लागणार असून त्यामध्ये प्रवाशांना रेल्वेच्या खात्यात आधीच पैसे जमा करावे लागणार आहेत. त्यानंतरच बॅलन्स असेपर्यंत तिकीट काढणे शक्य होणार आहे. 

या ऑर-वॉलेट योजनेमुळे स्टेशनवर तिकीट काढण्यासाठी येण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच तिकीट खिडक्यांसमोरील रांगासुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे. पूर्वी आम्ही मोबाईल तिकीट योजनेसाठी ऑनलाईन शॉपिंगप्रमाणे व्यवहारावेळी क्रेडिट वा डेबिट कार्डवरून पैसे कापणार होतो. परंतु प्रत्येक वेळी बँकेशी संपर्क साधणे आणि पैसे आहेत की नाही ते पाहणे हा वेळेचा अपव्यय असल्याने प्रवासी स्मार्टकार्डसाठी जसे रिचार्ज करतात तसेच आर-वॉलेट अँपमध्ये पैसे आगाऊ जमा करावे लागणार असल्याचे पांडे यांनी सांगितले. मध्य रेल्वे मार्गावर एटीव्हीएमची संख्या लवकरच वाढविण्यात येणार असून कॅश अँण्ड कार्डन मशीनचे टेंडरसुद्धा लवकरच निघणार असून यात प्रवाशांना तिकिटाची रक्कम वजा करून उरलेले पैसेदेखील परत मिळण्याची सोय असल्याचे पांडे यांनी सांगितले. उपनगरी रेल्वेत मोबाईल तिकीट योजना सुरू होणार असताना इतक्या एटीव्हीएमची आवश्यकता काय असे विचारता पांडे यांनी सर्वांनाच मोबाईलवरून तिकीट काढणे शक्य नसल्याचे मान्य केले. परंतु ही योजना सुरू झाल्यावर प्रवासी सीव्हीएम कुपन्सनादेखील विसरतील, असेही ते म्हणाले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages