कुस्तीपटू यादवना घर मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार - महापौर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कुस्तीपटू यादवना घर मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार - महापौर

Share This
मुंबई : राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदक पटकावणार्‍या कुस्तीपटू नरसिंग यादवना महापालिकेच्या कोट्यातून सदनिका देण्यास पालिका आयुक्तांनी स्पष्ट नकार दिला आहे. या विषयावर पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीतही चर्चा झाली. पण त्यात कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नाही. यामुळे यादवना शासनाकडून घर मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहे, असा दावा महापौर स्नेहल आंबेकर यांनी गटनेत्यांच्या सभेत केला. 

गटनेत्यांची बैठक बुधवारी रात्री उशिरा पालिका मुख्यालयात झाली. या वेळी उपमहापौर अलका केरकर, सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव, विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, भाजपाचे गटनेते मनोज कोटक, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते धनंजय पिसाळ, बेस्ट समिती अध्यक्ष अरविंद दुधवडकर तसेच पालिका आयुक्त सीताराम कुंटे, अतिरिक्त आयुक्त आदी उपस्थित होते. शिवसेनेचे नगरसेवक राजू पेडणेकर यांनी महापौरांना पत्र देऊन यादवना पालिका कोट्यातून घर देण्याची मागणी केली होती. पण, याबाबत महापालिका कोट्यातून विशेष बाब म्हणून विशिष्ट व्यक्तींना घर देण्याचे कोणतेही धोरण अस्तित्वात नसल्याने यादवना पालिकेकडून घर देणे अशक्य नसल्याचा अभिप्राय आयुक्तांनी दिला होता. गटनेत्यांच्या बैठकीत हा विषय चर्चेसाठी आला असता, 'आपण राज्य सरकारकडे यादव यांच्या सदनिकेबाबत पाठपुरावा करून त्यांना सदनिका मिळवून देऊ, असे महापौरांनी सांगितले. 

मुंबई महापालिकेतील शिक्षण विभागातील 'शिक्षण सेवकांना चार हजार रुपये सानुग्रह अनुदान तर खाजगी शाळेच्या शिक्षक सेवकांना दोन हजार रुपये सानुग्रह अनुदान आणि प्रमुख कामगार अधिकारी यांच्या कार्यालयांतर्गत असलेल्या कल्याण विभागातील अंशकालीन कर्मचार्‍यांनाही दोन हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे आदेशही महापौरांनी प्रशासनाला दिले. विलेपार्ले पश्‍चिम येथील आर्यन कूपर रुग्णालयातील महापालिका परिचारिका प्रशिक्षण विद्यालयास 'माँसाहेब मीनाताई ठाकरे परिचारिका विद्यालय' असे नामकरण करण्याची मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी महापौरांकडे केली होती आणि ती महापौरांनी मंजूर केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages