भाजप सरकारचं खातेवाटप जवळजवळ निश्चित - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाजप सरकारचं खातेवाटप जवळजवळ निश्चित

Share This
दोनच दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या भाजप सरकारचं खातेवाटप जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार टीकेचं लक्ष्य ठरणारं गृहखातं स्वतःकडे ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला असून नगरविकास खात्याचा कार्यभारही ते सांभाळणार असल्याचं समजतं. 


'टीम देवेंद्र'मधील सगळ्यात ज्येष्ठ मंत्री असलेल्या आणि युती सरकारच्या काळात अर्थखात्याची जबाबदारी सांभाळलेल्या एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खातं सोपवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुख्यमंत्रिपदावरच दावा सांगणाऱ्या खडसेंना महत्त्वाचं खातं देऊन त्यांची नाराजी काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न भाजपश्रेष्ठींनी केला आहे. वास्तविक, अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं असल्यानं ते खातं त्यांना पुन्हा दिलं जाण्याची शक्यता होती. परंतु, सुधीर मुनगंटीवार हे राज्याचे नवे अर्थमंत्री असतील, असं कळतं. विदर्भाच्या अनुशेषाचा मुद्दा लक्षात घेऊन ही जबाबदारी वैदर्भिय नेत्यावर देण्यात आल्याचं बोललं जातंय.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे-पालवे यांच्याकडे ग्रामविकास खातं देण्यात आलं आहे. केंद्रात मोदी सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री म्हणूनच शपथ घेतली होती. त्यामुळे पंकजा यांना ग्रामविकास खातं मिळणं हा योगायोग आहे, की त्यांचीच तशी इच्छा होती, याबद्दल उत्सुकता आहे.

नव्या राज्य मंत्रिमंडळात शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून विनोद तावडे काम पाहणार आहेत. त्याशिवाय, पश्चिम महाराष्ट्राचा चेहरा असलेले चंद्रकांत पाटील यांच्याकडे सहकार आणि पणन ही दोन महत्त्वाची खाती सोपवण्यात आल्याचं कळतं. आदिवासी विकास खातं अपेक्षेप्रमाणे विष्णू सावरा यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर, बड्या उद्योजकांशी जवळचे संबंध असलेल्या प्रकाश मेहता खाण आणि उद्योग मंत्री म्हणून काम पाहतील.

या खातेवाटपाची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. शिवसेनेशी पाठिंब्याबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे भाजपनं हा सावध पवित्रा घेतल्याचं बोललं जातंय. परंतु, भाजपनं अपेक्षेप्रमाणेच सगळी महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. आता ते शिवसेनेला कोणती खाती देतात, याबद्दल उत्सुकता ताणली गेली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages