शिक्षक परिषदेचा गुरुवारी राज्यभर 'रास्ता रोको' - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिक्षक परिषदेचा गुरुवारी राज्यभर 'रास्ता रोको'

Share This

मुंबई : शाळांच्या संच मान्यता आणि हजारो अतिरिक्तशिक्षक व शिक्षण सेवकांच्या सेवा संरक्षणाच्या बाबतीत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या सोबतची चर्चा फिस्कटल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने गुरुवार, २७ नोव्हेंबर रोजी सर्व जिल्ह्यांत 'रास्ता रोको' करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्र्यांनी ठोस आश्‍वासन न दिल्याने हे आंदोलन करणार असल्याचे शिक्षक परिषदेचे मुंबई उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले. 
शिक्षणमंत्र्यांनी सोमवारी मंत्रालयात शिक्षकांच्या अनेक संघटनांना चर्चेसाठी बोलावले होते. शिक्षक परिषदेच्या वतीने राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडू, कार्यवाह नरेंद्र वातकर, शिक्षक आमदार रामनाथ मोते, नागो गाणार, संजीवनी रायकर व अनिल बोरनारे यांनी हजारो अतिरिक्त शिक्षक व शिक्षण सेवकांना सेवेत संरक्षण देण्याबाबत तसेच जुन्या पद्धतीने शाळा संचमान्यतेचे निकष जारी करून त्याबद्दलचा शासन निर्णय जारी करण्याची आग्रही मागणी केली; परंतु शिक्षणमंत्र्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन सकारात्मक विचार करण्याचे आश्‍वासन दिले. राज्यात अतिरिक्त शिक्षकांच्या बाबतीत शिक्षणाधिकारी कार्यालये न्यायालयाचे स्थगितीचे आदेश न पाळता कारवाई करीत आहेत. तसेच शिक्षण सेवकांच्या सेवा समाप्त करून त्यांना घरी बसवण्याचे आदेश दिल्याने शिक्षण क्षेत्रात तीव्र नाराजी आहे. याकडे शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले; परंतु शिक्षणमंत्र्यांनी आश्‍वासनापलीकडे काहीच ठोस न सांगितल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने गुरुवारी हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण सेवक रस्त्यावर उतरणार आहेत. त्यात मुख्याध्यापक व संस्थाचालकही सहभागी होणार आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages