शिवसेना विरोधी पक्षात बसणार ! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिवसेना विरोधी पक्षात बसणार !

Share This
सत्तेसाठी प्रचंड आशावादी असलेल्या, 'जुळलं तर जुळवू' म्हणणाऱ्या, तळ्यात-मळ्यात उड्या मारणाऱ्या शिवसेनेनं अखेर आज विधिमंडळात विरोधी पक्षातच बसायचा निर्णय घेतला आहे. २०-२२ दिवसांच्या चर्चेनंतर, भाजपवर विश्वास ठेवण्यात अर्थ नसल्याचा साक्षात्कार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झालाय आणि स्वाभिमानाचा नारा देत, विश्वादर्शक ठरावावेळी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचे आदेश त्यांनी आपल्या ६३ शिलेदारांना दिलेत. त्यामुळे आता भाजप बहुमताचा आकडा कसं गाठतं, याबद्दल उत्सुकता ताणली गेली आहे. 

शिवसेना कुणासोबतही फरफटत जाणार नाही, लाचारी पत्करणार नाही, असा 'स्वाभिमानी' बाणा दाखवत शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपवर बाण सोडला आणि अनेक दिवस रखडलेला पाठिंब्याचा विषय निकाली निघाला. गेला महिनाभर आम्ही भाजपशी संपर्क साधतोय. मुंबई-दिल्ली, दिल्ली-मुंबई भेटीगाठी करून तिढा सोडवायचा प्रयत्न करतोय. परंतु, एवढं करूनही भाजपनं सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आता उद्धवसाहेबांचा त्यांच्यावर विश्वास नाही. म्हणूनच विश्वासदर्शक ठरावावेळी आम्ही भाजपच्या विरोधात मतदान करणार आहोत, असं रामदास कदम यांनी स्पष्ट केलं. परंतु, शिवसेनेचे हे आरोप भाजपनं फेटाळलेत. शिवसेना आपल्या शब्दावर ठाम राहिली नाही, राज्याच्या हितापेक्षा त्यांनी पक्षहिताला प्राधान्य दिलं, असा दावा प्रवक्ते माधव भंडारी आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्यातून नव्या शाब्दिक चकमकीचे, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याचेच संकेत मिळत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आज शक्तिपरीक्षेला सामोरं जाणार आहे. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ आपल्याकडे असल्याचं ते अगदी ठामपणे सांगताहेत. राष्ट्रवादीनं निवडणूक निकालाच्याच दिवशी त्यांना पाठिंबा जाहीर केलेला असल्यानं आणि जे देतील त्यांचा पाठिंबा घ्यायची भाजपची तयारी असल्यानं त्यांना 'आकड्या'ची तशी चिंता नाही. परंतु, शिवसेना काय करणार, 'मोठा भाऊ' ठरलेल्या भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार, की विरोधात बसणार, याबद्दल राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता होती. त्यावरून दोघांमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू होतं. दोघंही येन-केन-प्रकारेण एकमेकांवर दबाव टाकायचा प्रयत्न करत होते. शिवसेना आज एक बोलत होती, उद्या वेगळंच वागत होती.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधीवर बहिष्कार टाकून शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याच दिवशी ते भाजपसोबतची चर्चा थांबवतील, असं वाटत होतं. पक्षप्रमुख उद्धव यांनी धनुष्य उचललं पण बाण सोडलाच नाही. जुळलं तर बरं होईल, असं त्यांना वाटत होतं. म्हणूनच, पुढचे दोन दिवस ते विरोधकांसारखे वागले, पण चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच ठेवलं. त्यामुळे आज विश्वासदर्शक ठरावावेळी ते काय भूमिका घेणार, याबद्दल तर्कवितर्कच सुरू होते. शेवटी आज सकाळी त्यांनी या संदर्भात खुलासा केला आणि सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages