पाथर्डी हत्याकांड - आरोपींची नार्को चाचणी करण्यास न्यायालयाची परवानगी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पाथर्डी हत्याकांड - आरोपींची नार्को चाचणी करण्यास न्यायालयाची परवानगी

Share This
पाथर्डी : तालुक्यातील जवखेडे येथील दलित हत्याकांडातील साक्षीदारांची वैज्ञानिक, पॉलीग्राम आणि नार्को चाचणी घेण्यासाठी येथील न्यायाधीश शिवाजी केकाण यांनी पोलिसांना परवानगी दिली आहे. यामुळे सहा साक्षीदारांना घेऊन पोलिसांचे पथक अहमदाबादला सोमवारी सायंकाळी रवाना झाले आहे.

जवखेडे येथील दलित हत्याकांडातील आरोपींचा शोध घेण्यात तपासी अधिकारी व पोलीस यंत्रणेला अद्याप यश मिळालेले नाही. पोलीस सर्व शक्यता तपासत आहेत. घटनेतील काही संभाव्य साक्षीदारांच्या काही चाचण्या करण्यासाठी पोलिसांनी पाथर्डीच्या न्यायालयात परवानगीची मागणी केली होती. न्यायाधीश शिवाजी केकाण यांनी पोलिसांच्या मागणीचा विचार करून ज्यांच्या चाचण्या करायच्या आहेत, त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी संबंधित ६ जणांना नोटिसा बजावल्या होत्या. सोमवारी सहा साक्षीदारांनी आपले म्हणणे वकिलांमार्फत न्यायालयासमोर मांडले. नार्को चाचणी, वैज्ञानिक चाचणी व लाय डिटेक्टर आणि पॉलीग्राफ चाचणी करण्याची परवानगी देण्यासाठी आमची काही हरकत नाही, असे साक्षीदारांनी न्यायालयात सांगितले. 

न्यायाधीश शिवाजी केकाण यांनी चाचणीसाठी पोलिसांना परवानगी दिली. मात्र साक्षीदारांना आपल्या वकिलांसोबत चाचणीसाठी जाता येईल, असे स्पष्ट करण्यात आले. शासनाच्या वतीने तपासी अधिकारी सुनील पाटील यांनी आणि सहकारी वकील शिवाजी दराडे यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. साक्षीदारांच्या वतीने राणा खेडकर, महादेव आठरे, सुभाष बडे व आर.एन. कराळे यांनी युक्तिवाद केला. एका साक्षीदाराच्या घरात कोणीही व्यक्ती घराची काळजी घेण्यासाठी नसल्याने जनावरांना चारा, पाणी करण्यासाठी पोलिसांनी जबाबदारी घ्यावी, अशी मागणी केल्याने ती सुविधा पुरविण्याचे पोलिसांनी मान्य केले. यामुळे सहा साक्षीदारांना घेऊन पोलिसांचे पथक अहमदाबादकडे सोमवारी सायंकाळी रवाना झाले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages