बेदरकार वाहनचालकांकडून २0 कोटींचा दंड वसूल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेदरकार वाहनचालकांकडून २0 कोटींचा दंड वसूल

Share This
नो-पार्किंगमध्ये गाडी उभी करणार्‍यांकडून सर्वाधिक दंड
मुंबई ( जेपीएन न्यूज ):  वाहन तळा ऐवजी दुसर्‍याच ठिकाणी आपले वाहन उभे करणे तसेच दारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालवणार्‍या वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांनी चालू वर्षी २0 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान केलेल्या कारवाईत हा दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबईत जागेअभावी पार्किंगची समस्या भेडसावत असल्यामुळे जागा दिसेल त्या ठिकाणी बिनदिक्कतपणे गाडी उभी करण्याचे प्रकार वाढत आहेत. नो-पार्किंगमध्ये गाडी उभी केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक म्हणजेच ४.१७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

दारूच्या नशेत गाडी चालवण्याचे प्रकारही कमी होत नसून अशा तळीरामांकडून ३.२१ कोटी रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी वसूल केला आहे. मागील वर्षी पोलिसांनी २३ कोटींचा दंड वसूल केला होता. अद्याप डिसेंबर महिन्यात वसूल करण्यात आलेल्या दंडाची रक्कम यामध्ये जमा करण्यात आली नसल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक दंड वसूल होईल, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे. 'गटारी अमावास्या आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला तसेच शुक्रवार आणि शनिवारीदेखील आम्ही ड्रिंक ड्रायव्हिंगविरोधातील मोहीम अधिक तीव्र करतो. यामुळे मोठय़ा प्रमाणावर दंड वसूल करण्यात आला आहे. दारू पिऊन गाडी चालवणार्‍या वाहनचालकांवर कायद्याचा बडगा उगारणे आवश्यक आहे,' असे पोलीस सह-आयुक्त (वाहतूक) बी. के. उपाध्याय यांनी सांगितले. सिग्नल तोडणार्‍या वाहनचालकांकडून वाहतूक विभागाने २.२६ कोटींचा दंड वसूल केला आहे. भाडे नाकारणार्‍या टॅक्सी आणि रिक्षाचालकांकडून २९ हजार रुपयांचा दंड वाहतूक विभागाने वसूल केला आहे. तर गाडी चालवत असताना मोबाईल फोनवर बोलणार्‍या वाहनचालकांकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

गुन्हे आणि दंडाची रक्कम बेकायदेशीर पार्किंग : ४-१७ कोटी
ड्रंक अँण्ड ड्राईव्ह : ३.२१ कोटी
सिग्नल तोडणे : २.२६ कोटी
हेल्मेटशिवाय गाडी चालवणे : २.१७ कोटी
गडद रंगाच्या काचा : ८१ लाख
नको तिथे गाडी थांबवणे : ७७ लाख 
झेब्रा क्रॉसिंग : ६७ लाख 
लेन कटींग : ५५ लाख 
सेफ्टी बेल्ट नसणे : ४४ लाख 
नंबर प्लेट : ४४ लाख

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages