म्हाडा दुरुस्ती मंडळ होणार हायटेक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

म्हाडा दुरुस्ती मंडळ होणार हायटेक

Share This
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचा कारभार संपूर्णत: संगणकीकृत करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून, नव्या वर्षात मंडळाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, हा उद्देश या संकल्पनेमागे असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.

म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारित दक्षिण मुंबईतील उपकर प्राप्त इमारती, संक्रमण शिबिरे, पुनर्विकासाच्या प्रक्रियेतील इमारतींचा अंतर्भाव आहे. या इमारती ४0 वर्षे जुन्या असून अनेक इमारती धोकादायक असून तेथील रहिवाशांची मूळ नावे, रिक्त केलेल्या इमारतींतील रहिवाशांची नावे, संक्रमण शिबिरातील अधिकृत भाडेकरू, बेकायदेशीर भाडेकरू, यांची माहिती मंडळाकडे असली तरीही काही वेळेस कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रकार, तसेच खरी माहिती नसल्याचेच प्रकार निदर्शनास आल्याने दुरुस्ती मंडळाकडून संगणकीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मूळ रहिवाशांवर अन्याय होऊ नये, तसेच एखाद्या इमारतीतील रहिवाशांचे स्थलांतर नेमके कधी व कोणत्या कारणास्तव झाले, याची इत्यंभूत माहिती म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाकडे नाही. त्यामुळे अनेकदा घुसखोर कोण आणि मूळ भाडेकरू कोण यामध्ये गोंधळ निर्माण होतो. म्हणूनच म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाकडून प्रोबेटी कंपनीला संगणकीकृत सॉफ्टवेअर तयार करण्यास नेमण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत सॉफ्टवेअर तयार झाल्यावर माहिती भरल्यानंतर नव्या वर्षात एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages