विरोधी पक्षनेत्यांच्या अनुपस्थितीत होणार पहिलेच विधिमंडळ अधिवेशन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विरोधी पक्षनेत्यांच्या अनुपस्थितीत होणार पहिलेच विधिमंडळ अधिवेशन

Share This
मुंबई : राज्यात विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांच्या अनुपस्थितीत विधिमंडळाचे इतिहासातील पहिले अधिवेशन येत्या ८ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार आहे. शिवसेनेने सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे सध्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा अध्यक्षांकडे सादर करतील.

नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर होणार्‍या विशेष अधिवेशनात विरोधी पक्षनेत्यांची निवड केली जाते. त्यानंतर होणार्‍या विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत इतर विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक होते आणि ते अधिवेशनात सरकारला धारेवर कसे धरायचे याची रणनीती आखतात. त्यानंतर ते सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांबरोबर विशेषत: मुख्यमंत्र्यांसमवेत चहापानाची बैठक करत अधिवेशनातील संभाव्य विषयांवर, कामकाजावर चर्चा करून कामकाज निश्‍चित करण्यास हातभार लावतात. काही वेळा विरोधक या बैठकीवर बहिष्कार घालून आपला निषेधही व्यक्त करतात. या वेळी मात्र अशी बैठक होणार नाही. सध्याचा विरोधी पक्ष शिवसेना सत्तेत सहभागी होत आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी संघर्ष सुरू आहे. त्यामुळे या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांबरोबरील चहापानाच्या बैठकीत फार सनसनाटी काहीही नसेल. मात्र मराठवाड्यातील दुष्काळ, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, कायदा आणि सुव्यवस्था अशा काही विषयांवर काँग्रेस तसेच राष्ट्रवादी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करेल. जवखेडे तिहेरी हत्त्याकांडातील आरोपी सापडल्याने हा विषय बाजूला पडण्याची शक्यता आहे.

राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांशी दुष्काळाबाबत चर्चा केली. शुक्रवारी केंद्र सरकारचे पाहणी पथक राज्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. शिवसेना तसेच भाजपाच्या नेत्यांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यामुळे त्यांनाही याची दाहकता माहीत आहे. त्यामुळे अधिवेशनात सरकारला फारशी अडचण येणार नाही, असे दिसते. शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी विधानभवनासमोरील पटांगण सज्ज होत आहे. अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी विशेष आसनव्यवस्था करण्यात येत आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव दुपारी चार वाजता होणार्‍या एका समारंभात नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहेत. संभाव्य मंत्र्यांमध्ये शिवसेनेकडून सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, एकनाथ शिंदे आणि रवींद्र वायकर यांना तर भाजपाकडून गिरीश बापट, गिरीश महाजन, बाळा भेगडे, सुरेश खाडे, राज पुरोहित यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे विजय शिवतारे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, राजेश क्षीरसागर, दादा भुसे व अर्जुन खोतकर यांना तर भाजपाचे राम शिंदे, संजय कुटे, चैनसुख संचेती, सीमा शिंदे आदी राज्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत. भाजपाच्या निवडणुकीतील मित्रपक्षांचा सरकारमध्ये समावेश झाल्यास राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, रिपब्लिकन पक्षाचे अविनाश महातेकर आणि शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages