महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई पालिका, बेस्ट सज्ज - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई पालिका, बेस्ट सज्ज

Share This
मुंबई - राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या (६ डिसेंबर) रोजी ५८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशातून आणि राज्यातून येणार्‍या किमान २५ लाखांहून अधिक आंबेडकरी अनुयायांसाठी मुंबई महापालिकेतर्फे दादर येथील शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी येथे विविध नागरी सुविधा देण्यात येणार आहेत.

पालिकेतर्फे चैत्यभूमी, शिवाजी पार्क, राजगृह, हिंदू कॉलनी, दादर रेल्वे स्थानक, एलटीटी स्थानक, डॉ. आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) आदी ठिकाणी सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. चैत्यभूमीवर येणार्‍या अनुयायांमध्ये लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश असतो. त्यांना शिस्तीने दर्शन होण्यासाठी व त्यांच्या निवासाची, खाण्या-पिण्याची आणि विश्रांतीची सेवा-सुविधाही महापालिकेकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही दिली आहे. स्काऊट हॉल येथे भिक्कूंच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

वडाळा येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या दोन हजार चौरस मीटर जागेतही तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात आली असून, शिवाजी पार्कवरील एक लाख चौरस फुटांच्या क्षेत्रात तंबू व मंडपातही अनुयायांच्या विश्रांतीची आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुरुष अनुयायांसाठी १२५, महिलांसाठी १२५ स्नानगृहे शिवाजी पार्क परिसरात व अन्यत्र २७0 शौचकुपे, २७ फिरती शौचालये उभारण्यात येणार आहेत. इंदू मिलच्या मागे १५0 बंदिस्त शौचालये, दादर चौपाटी येथे ३0 बंदिस्त शौचालयांची सुविधा देण्यात येणार असून, पिण्याच्या पाण्यासाठी २७0 नळांची व्यवस्था आणि रांगेतील व परिसरातील अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याचे १५ टँकर्सही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शिवाय शिवाजी पार्कच्या मैदानात आंबेडकरी साहित्य, खाद्यपदार्थ, वस्तू आदींच्या विक्रींसाठी ४६९ स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. महापालिकेच्या वतीने या सर्व सेवा-सुविधांवर दोन ते अडीच कोटी खर्च केला जाणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या 'राजगृह' येथे नियंत्रण कक्ष, वैद्यकीय कक्ष सुरु करण्यात येणार असून, कुर्ला टर्मिनस परिसरात नियंत्रण कक्ष आणि आरोग्य सेवा कक्ष व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. दादर पूर्वेला असलेल्या स्वामीनारायण मंदिराजवळ नियंत्रण व माहिती कक्ष, फिरती शौचालये, स्नानगृहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. आंबेडकरी अनुयायांनी पालिकेने दिलेल्या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर स्नेहल आंबेकर आणि महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी केले आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्ट सज्ज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी आणि शनिवारी (५ आणि ६ डिसेंबर) बेस्ट उपक्रम दादर येथील चैत्यभूमीवर येणार्‍या जनसमुदायाकरिता विविध सेवा-सुविधा पुरविण्यासाठी सज्ज झाला आहे. चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क, दादर चौपाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राजगृह, आंबेडकर कॉलेज या ठिकाणी २३४ अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे बसवण्यात आले आहेत. वीजपुरवठा अखंडित ठेवण्याकरिता ५00 के.व्ही.ए. क्षमतेचे २ जनरेटर्स चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क मैदानावर ठेवण्यात आले आहेत. चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क मैदान परिसरातील महानगरपालिकेने परवानगी दिलेल्या विविध संस्थांच्या मंडपांना तात्पुरती मीटर जोडणी धर्मादाय वीजदराने देण्याकरिता शिवाजी पार्क मैदानात एक खिडकी योजना उभारण्यात आली आहे. त्याद्वारे आतापर्यंत ३६ मागणी अर्जांची नोंदणी करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी एकूण ६५ मीटरची जोडणी करण्यात आली होती. तसेच शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून शनिवारपर्यंत जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. शिवाजी पार्क बसचौकी आणि शिवाजी पार्क येथील तंबूमध्ये वाहतूक माहिती केंद्र उघडण्यात आले आहे. ५ आणि ६ डिसेंबर रोजी दैनंदिन बसपास ४0 रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे. हे विशेष तिकीट असल्यामुळे त्याकरिता ओळखपत्राची आवश्यकता नाही. बेस्ट उपक्रमातर्फे येणार्‍या जनसमुदायाकरिता प्रथमोपचार केंद्र व वैद्यकीय मदत केंद्राची देखील उभारणी करण्यात आली आहे. त्याद्वारे ७५0 लोकांना प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या, तत्त्वावर चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच २0 हजार लोकांना अल्पोपाहार आणि पाणीवाटप करण्यात येणार आहे. बेस्ट उपक्रमातर्फे ६ डिसेंबरसाठी खास १0 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages