चैत्यभूमीवर भीमसागराचे अभिवादन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चैत्यभूमीवर भीमसागराचे अभिवादन

Share This
मुंबई - ‘बुद्धं सरणं गच्छामि’चा जयघोष आणि ‘जय भीम’चा नारा देत देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या ३० लाख भीमसैनिकांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ५८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आलेल्या भीमसैनिकांमुळे संपूर्ण दादरचा परिसर ‘जय भीम’मय झाला. 

रेल्वे, टेम्पो, ट्रक, बस मिळेल त्या वाहनाने दादरमध्ये पोहोचलेल्या भीमसैनिकांनी चैत्यभूमीची वाट धरली. चैत्यभूमीच्या दिशेने जाणारी गल्लोगल्ली भीमसैनिकांनी फुलून गेली. डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी उसळलेल्या गर्दीने उच्चांक गाठला. नेहमी वाहनांना वाट करून देणार्‍या वाहतूक पोलिसांना या गर्दीसाठी मार्ग मोकळा करण्यासाठी पराकाष्ठा करावी लागत होती.
भीमसाहित्याला मागणी 
‘जातिप्रथेचे विध्वंसन’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर ते महापरिनिर्वाण’, ‘रमाई’, ‘डॉ. आंबेडकरी चळवळ आणि विपश्यना’, ‘भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म’, ‘संविधान सभेतील वादविवाद’, ‘मिलिंद प्रश्‍न’ या पुस्तकांसाठी वाचकांची झुंबड उडत होती. रस्त्यावर तसेच शिवाजी पार्कवरील मंडपात भीमसाहित्यावरील पुस्तकांच्या प्रत्येक स्टॉलवर गर्दी केली होती.
- पोलिसांचा चोख बंदोबस्तगुप्तचर विभागाने दिलेला ऍलर्ट तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार या पार्श्‍वभूमीवर शिवाजी पार्क तसेच चैत्यभूमी परिसरातही पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. शिवाजी पार्कमध्ये प्रवेश करणार्‍या प्रत्येक प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर, निरीक्षण मनोरे उभारण्यात आले होते. प्रवेश करणार्‍या प्रत्येकाची बॅग आणि सामान तपासल्यानंतरच आत सोडले जात होते. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांनीही वाहतूक तसेच गर्दीला मार्ग मोकळा करून देण्यासाठी विशेष व्यवस्था केली होती.
- महापालिका ऑनड्युटी
मोठ्या प्रमाणावर उसळणारी गर्दी आणि खानपानाची व्यवस्था यामुळे कुठेही अस्वच्छता निर्माण होऊ नये याची विशेष काळजी महापालिकेकडून घेण्यात आली. अनुयायांसाठी मंडप, रुग्णवाहिन्यांची व्यवस्था, फिरती शौचालये, पाण्यासाठी टँकर्स, भिख्खूंसाठी निवास व्यवस्था, धूळ उडू नये म्हणून मॅटस् अशी चोख व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली होती. कचरा सफाईसाठी कर्मचारी तसेच गाड्या सतत कार्यरत होत्या.
- प्रथमच शासकीय सलामी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या भीमसैनिकांची लाटच चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क परिसरात उसळली. करोडो अनुयायांनी चैत्यभूमीवर माथा टेकून आपल्या मुक्तिदात्याला मानवंदना दिली तर पोलिसांनीदेखील बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय सलामी दिली.
स्मारकाचे भूमिपूजन १४ एप्रिलला...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन १४ एप्रिल रोजी करण्यात येईल. केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे हे स्मारक उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
- मुख्यमंत्री, महापौरांसह नेत्यांचे अभिवादन
राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर स्नेहल आंबेकर यांनी चैत्यभूमीवर पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्याचप्रमाणे केंद्रीय उद्योगमंत्री प्रकाश मेहता, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, उपमहापौर अलका केरकर, सभागृहनेत्या तृष्णा विश्‍वासराव, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रिपाइं अध्यक्ष खासदार रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, माजी मंत्री व आमदार छगन भुजबळ, आमदार वर्षा गायकवाड, अतिरक्ति मुख्य सचिव पी. एस. मीना, पालिका आयुक्त सीताराम कुंटे, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages