मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशी करा - राज्यपालांकडे मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2014

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशी करा - राज्यपालांकडे मागणी

मुंबई ( जेपीएन न्यूज ) :  मुंबई महापानगरपालिकेत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून या भ्रष्टाचार प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी राज्यपालांनी आपल्या अधिकारांतर्गत न्यायालयीन चौकशी सुरू करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपालांकडे केली.


विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच आमदार विद्या चव्हाण, भाई जगताप, रमेश कदम, पांडुरंग बरोरा, वैभव पिचड, जनार्दन चांदूरकर, कालिदास कोळंबकर, अमीन पटेल, नरहरी झिरवळ आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
राज्यपालांना निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार रोखला गेला, तर मुंबईतील घरांच्या किमती प्रति स्क्वेअर फुटामागे ५00 रुपयांनी कमी होतील, असे विधान खुद्द लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केले आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराविषयी एका खासदारानेच ही माहिती दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यावरून मुंबई महापालिकेत किती मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार चालतो हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा भ्रष्टाचार खणून संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे. सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. राज्यातदेखील त्यांचेच सरकार आहे. त्यामुळे यावर योग्य ती कारवाई होईल, याबाबत आम्हाला शंका आहे. त्यामुळे आम्ही राज्यपाल महोदयांना याबाबत न्याय मागण्यासाठी भेटलो असून मुंबई महापालिका भ्रष्टाचार प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी त्यांनी आपल्या अधिकाराअंतर्गत न्यायालयीन चौकशी सुरू करावी, अशी विनंती त्यांना केली आहे. 

Post Bottom Ad