मुंबईसाठी समिती नेमण्यास शिवसेनेसह सर्वपक्षीयांचा विरोध - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईसाठी समिती नेमण्यास शिवसेनेसह सर्वपक्षीयांचा विरोध

Share This
मुंबई : मुंबईसाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमण्याच्या मुद्दय़ावरून सोमवारी भाजपा वगळता सर्वपक्षीयांनी कडाडून विरोध केला. पालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी याबाबत मांडलेल्या निवेदनावरून पालिकेच्या महासभेत वादळी चर्चा झाली. यावरून चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र सभागृहात निर्माण झाले होते. चर्चेच्या वेळी सभागृहात तणावपूर्ण वातावरण झाले होते. या वेळी शाब्दिक चकमकी झाल्या. 
मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही, असा निश्‍चय सर्वपक्षीयांनी केल्यामुळे अद्याप अशी कोणतीही समिती नेमलेली नाही, असे स्पष्टीकरण भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांना द्यावे लागले. या वेळी शिवसेना आणि विरोधी पक्ष व भाजपा विरुद्ध विरोधी पक्ष यांच्या शाब्दिक चकमक झाली. महापालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी, मुंबईसाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संकेत दिल्याचे सांगून, एका निवेदनाद्वारे सभागृहात चर्चा उपस्थित केली. 

मुंबई महापालिका सक्षम असताना विशेष समिती कशाला, मुख्यमंत्री सक्षम नाहीत का, समिती नेमण्याची गरज मुख्यमंत्र्यांना का भासली, त्यामागे हेतू काय, असे प्रश्न आंबेरकर यांनी केले. भाजपा २0१७ च्या महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मुंबईवर डोळा असून, शिवसेनेला डिवचण्याचा प्रकार आहे, अशी टीका आंबेरकर यांनी केली. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे भाजपाचे कारस्थान आहे, असा आरोपही आंबेरकर यांनी केला. 

शिवसेना सत्तेत नसताना व आजही शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षाचीही मुंबई विदर्भासह महाराष्ट्र अखंड राहिलाच पाहिजे, ही भूमिका कायम आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईसाठी 'सीईओ' नेमण्याबाबतही शिवसेनेने विरोध केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही भूमिका स्पष्ट केली होती, असे सेनेचे नगरसेवक सुनील प्रभू म्हणाले.तर मुंबई महाराष्ट्राचीच होती आणि यापुढेही राहणार आहे. मुंबईची स्वायत्तता ही कायम राहील, असे महापौर स्नेहल आंबेकर म्हणाल्या.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages