७ / ११ / २00६ बॉम्बस्फोटांचा नऊ वर्षांनंतर निकाल - १२ दोषी, १ निर्दोष - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

७ / ११ / २00६ बॉम्बस्फोटांचा नऊ वर्षांनंतर निकाल - १२ दोषी, १ निर्दोष

Share This
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह संपूर्ण देश हादरवून सोडणार्‍या ७/११च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष मोक्का न्यायालयाने शुक्रवारी प्रतिबंधित 'सिमी'च्या १३ दहशतवाद्यांपैकी १२ जणांना दोषी ठरवले, तर एका आरोपीला निर्दोष मुक्त केले. पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरी लोकल गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट घडवून तब्बल १८८ निष्पाप नागरिकांचे बळी घेणार्‍या दोषींना न्यायालय येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार आहे. बॉम्बस्फोटांना ९ वर्षे उलटल्यानंतर हा निकाल जाहीर झाला आहे. आरोपींपैकी ५ जणांवर हत्येचा आरोप असल्याने त्यांना फाशी सुनावली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
११ जुलै २00६ रोजी मुंबापुरीची नेहमीप्रमाणे धावपळ सुरू असतानाच मुंबईकरांची 'जीवनवाहिनी' असलेली उपनगरी लोकल साखळी बॉम्बस्फोटांनी हादरून गेली. पश्‍चिम रेल्वेमार्गावरील खार रोड-सांताक्रुझ, वांद्रे-खार रोड, जोगेश्‍वरी-माहिम जंक्शन, मीरा रोड-भाईंदर, माटुंगा-माहिम जंक्शन आणि बोरिवली स्थानकांदरम्यान उपनगरी लोकलच्या 'फस्र्ट क्लास' डब्यात अवघ्या ८ मिनिटांच्या अवधीत ७ बॉम्बस्फोट झाले. एटीएसच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय' आणि लष्कर-ए-तोयबाने या स्फोटांचा कट घडवून आणला. या बॉम्बस्फोटात १८८ निष्पाप नागरिकांचा बळी गेला, तर तब्बल ८१७ जण जखमी झाले. याप्रकरणी विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश यतीन डी. शिंदे यांनी शुक्रवारी निकाल जाहीर केला. न्यायालयाने कमल अहमद अन्सारी (३७), डॉ. तन्वीर अहमद अन्सारी (३७), मोहम्मद फैजल शेख (३६), एतेशाम सिद्दिकी (३0), मोहम्मद मजिद शफी (३२), शेख आलम शेख (४१), मोहम्मद साजिद अन्सारी (३४), मुज्जमिल शेख (२७), सोहेल मेहमूद शेख(४३), जमीर अहमद शेख (३६), नवीद हुसैन खान (३0) आणि असिफ खान (३८) या १२ आरोपींना दोषी ठरवले, तर अब्दुल वाहिद शेख (३४) या आरोपीला निर्दोष मुक्त केले. या प्रकरणात अन्य १४ आरोपींसह आझम चिमा अद्यापि फरारी आहे. बॉम्बस्फोटांचा कट रचणे आणि प्रत्यक्ष बॉम्बस्फोट घडवण्यात सहभागी झाल्याच्या आरोपावरून कलम १२0(बी), ३0२ आणि मोक्का कायद्यातील कलम ३११ अन्वये न्यायालयाने १२ आरोपींना दोषी ठरवले. यापैकी ५ जणांवर हत्येचा आरोप असल्याने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. या खटल्याची सुनावणी मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश यतीन डी. शिंदे यांच्यापुढे जून २00७ मध्ये सुरू झाली आणि गेल्या वर्षी १९ ऑगस्टला युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. तब्बल ८ वर्षे सुनावणी सुरू राहिलेल्या या खटल्यात सरकारी पक्षाने १९२ साक्षीदार तपासले. यात १८ डॉक्टर आणि ८ आयपीएस व आयएएस अधिकार्‍यांचा समावेश आहे. दुसरीकडे, बचाव पक्षाने ५१ साक्षीदार तपासले तसेच न्यायालयाने स्वत:हून एका व्यक्तीची साक्ष तपासली. साक्षीदारांच्या जबानीची जवळपास ५५00 पाने झाली. या सर्व साक्षीपुराव्यांच्या आधारे न्यायाधीश यतीन डी. शिंदे यांनी शुक्रवारी निकाल जाहीर केला. दोषींना शिक्षा सुनावण्यासाठी येत्या सोमवारी उभय पक्षांचे युक्तिवाद सुरू राहणार आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages