मध्य वैतरणा धरणाचे दरवाजे उघडले
मुंबई / 19 Sep 2015
मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सात तलावांपैकी बहुतेक धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मध्य वैतरणा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. मोडक सागर तलाव परिसरात ७८ मिमी पाऊस पडला आहे. तानसा तलाव परिसरात ८२ मिमी, विहार तलाव परिसरात १० मिमी, तुलसी तलाव परिसरात १३ मिमी, अप्पर वैतरणा परिसरात १४५ मिमी, भातसा तलाव परिसरात ९७ मिमी तर मध्य वैतरणा तलाव परिसरात १३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईतील सर्व तलाव पाण्याने पूर्ण भरले तर उपयुक्त पाणीसाठा हा 14,47,363 दशलक्ष लिटर एवढा असतो. मुंबईत कालपर्यंत केवळ 211 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठाही अत्यंत कमी आहे. मात्र दोन दिवसांच्या तुलनेत सध्या पाणीसाठ्यात वाढ होत चालली आहे. मुंबईतील तलावांमधल्या एकूण पाणीसाठ्यात 48,499 दशलक्ष लिटरची वाढ झाली आहे. सर्व तलावांमध्ये 1043001 दशलक्ष लिटर इतका पाण्याचा साठा आहे. मुंबईत दररोज 3750 दशलक्ष लिटर एवढा पाणी पुरवठा केला जातो.एका दिवसात पडलेल्या पाऊसामुळे आता २७८ दिवसांचा पाणी साठा जमा झाला आहे.
तलाव पातळी - १९ सप्टेंबर २०१५
मोडक सागर -- ११८८८१ दशलक्ष लिटर
तानसा -- १२१०७३ दशलक्ष लिटर
विहार -- ११९८३ दशलक्ष लिटर
तुळशी -- ७८०४ दशलक्ष लिटर
अप्पर वैतरणा -- ११९९७४ दशलक्ष लिटर
भातसा - ४७३४७० दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा --१८९८१६ दशलक्ष लिटर
एकूण जलसाठा १०४३००१ दशलक्ष लिटर
