ठाकरेंचे स्मारक वादात अडकणार ! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ठाकरेंचे स्मारक वादात अडकणार !

Share This
शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्यांनी नेहमीच वाद निर्माण व्हायचा. असाच वाद त्यांनी आंबेडकरी समाजासाठी निर्माण केला होता. मराठवाडा विद्यापिठाच्या नामांतरावेळी घरात नाही पीठ आणि मागतात विद्यापीठ असे वक्तव्य केले होते. दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासही विरोध केला होता. अश्या अनेक वादामुळे बाळासाहेब ठाकरे आंबेडकरी समाजाचे विरोधक असल्याचे स्पष्ट झाले होते. असेच अनेक वाद इतरांबरोबरही झाले आहेत. असे वाद निर्माण करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक कुठे बनवावे यासाठी गेले तीन वर्षे जागा शोधली जात होती. मुंबईच्या महापौरांसाठी राखीव असलेल्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यातच हे स्मारक होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे. बाळासाहेबांच्या तिसऱ्या स्मृतिदिना निमित्त मुख्यमंत्री शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट द्यायला आले असता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करून बाळासाहेबांच्या स्मारकाची जागा निश्चिती केली आणि या जागेवरूनच वाद सुरु झाला आहे.

पत्रकारांशी बोलताना बाळासाहेबांनी राज्यासाठी केलेले कार्य स्मारकाच्या माध्यमातून पुढे नेण्याचे काम सरकार आणि ट्रस्टच्या माध्यमातून केले जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. स्मारक केव्हा पूर्ण होणार याचा कालावधी अद्याप ठरलेला नाही, मात्र आमच्या कार्यकाळात १०० टक्के काम पूर्ण होईल, अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली. युतीतील वादावर फडणवीस यांनी भाष्य केले. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आज नाहीत, पण दोन पक्षातील वाद त्यांनी कशा प्रकारे सोडवले असते हे आम्हाला माहित आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेचा प्रश्न निकाली काढला असताना स्मारकाच्या जागेचा नाहक वाद निर्माण केला जात आहे. मुंबई महानगर पालिकेत आणि राज्यात स्माराकावरून विरोध केला जात आहे. महापौर बंगला हे सरकारी निवासस्थान असल्याने आणि बाळासाहेबांसारख्या उत्तुंग अश्या व्यक्तिमत्वाला हि जागा कमी असल्याने महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक उभारले जाऊ नये अशी मागणी मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिका सभागृहात निवेदनाद्वारे केली. यावेळी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी बांद्रा येथील मातोश्री बंगलाच योग्य असल्याने मातोश्रीवरच बाळासाहेबांचे स्मारक बनवावे अशी मागणी देवेंद्र आंबेरकर यांनी केली.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. या शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना आणि त्यांच्या बंगल्याला अनन्य साधारण महत्व आणि प्रतिष्ठा आहे. महापौर बंगल्याला ऐतिहासिक वस्तू म्हणून दर्जा आहे. अशी ऐतिहासिक दर्जा असलेली वास्तू स्मारकासाठी घेणे अयोग्य असल्याचे आंबेरकर यांनी म्हटले आहे. महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याची घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी चुकीचा पायंडा पाडला असल्याचे सांगत येणाऱ्या काळात मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला व अन्य शासकीय निवासस्थाने देखील स्मारकाच्या नावाने दिली जातील अशी शक्यता आंबेरकर यांनी यावेळी व्यक्त केली. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी बाळासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तीमत्वाचे स्मारक बनवायचे असल्यास महापौर निवासस्थानापेक्षा मोठ्या जागेत बनवावे अशी मागणी केली.

काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी महापौरांचे निवासस्थान भायखळा येथील राणीबागेत हलवल्यास बुधवारी राणीबाग बंद ठेवली जात असल्याने महापौर बुधवारी लोकांना मिळणार नाहीत का ? महापौरांना भेटायला तिकीट काढून भेटायला लागणार का असे उपरोधिक प्रश्न उपस्थित केले. पालिकेची जागा देण्याचा मुख्यमंत्र्याना अधिकार नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारची जाग स्मारकाला का दिली नाही असा प्रश्न छेडा यांनी उपस्थित केला. भाजपाने टाकलेल्या गुगलीत शिवसेनेची विकेट पडल्याचेही छेडा यांनी म्हटले. समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी मातोश्री हि ठाकरे घराण्याची स्वतःची संपत्ती असल्याने यी संपत्ती मध्ये बाळासाहेबांचे स्मारक उभारावे अशी मागणी करत महापौर बंगला हि महापौरांची शान असल्याने महापौरांची शानकमी करू नये असे रईस शेख म्हणाले.

या चर्चे मध्ये भाग घेताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी बाळासाहेबांचे स्मारक उभारायचे असल्यास वाद न करता उभारावे असे सांगितले. केंद्र सरकारने सरकारी बंगल्यात कोणाचेही स्मारक उभारू नये असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा आधार घेवून कोणी न्यायालयात गेल्यास स्मारक वादात अडकू शकते. शिवसनेचे नेते असलेल्या रविंद्र वायकर यांच्या संस्थेला ५ एकर जागा, सेनेचे खासदार असलेल्या राहुल शेवाळे यांच्या आम्युजमेंट पार्कला हेक्टरमध्ये जागा मिळणार आहे असे असताना बाळासाहेबांच्या स्मारकाला जागा का मिळत नाही असा प्रश्न संदिप देशपांडे यांनी उपस्थित करत महापौर बंगला लाटण्याचा हा प्रकार असल्याचे देशपांडे यांनी म्हटले. तर याबाबत बोलताना सेना भाजपाच्या नगरसेवकांनी महापौरांच्या बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक कसे योग्य आहे, बाळासाहेबांचे शिवाजी पार्क आणि महापौर बंगला याच्याशी असलेले संबंध यामुळे महापौर बंगल्याची जागा कशी योग्य आहे असे ठासून बाजू मांडली आहे.

मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान असलेला दादर समुद्रालगतचा सुसज्ज बंगला उद्धव ठाकरे अध्यक्ष असलेल्या नियोजित ट्रस्टला तीस वर्षाच्या कराराने द्यायचा निर्णय महापालिका प्रशासन घेणार आहे.तशा सक्त सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना दिलेल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईतील महापौर बंगला देण्याचा राज्यातील फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते व रॉबर्ट वध्रा यांचे मेहुणे तेहसीन पूनावाला यांनी केली आहे.


तर ‘सर्वोच्च न्यायालयाने 5 जुलै 2013 रोजी केलेल्या अधिसूचनेनुसार केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 18 ऑक्‍टोबर 2014 रोजी शासकीय बंगल्याचे राजकीय नेत्यांच्या स्मारकामध्ये रूपांतर करण्यास बंदी घातलेली आहे. याच कारणास्तव माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे दिल्लीतील 10 राजाजी मार्गावरील निवासस्थानाचे स्मारकात अथवा विज्ञान संग्रहालयात रूपांतर होऊ शकलेले नाही.‘‘ ‘हा निर्णय बेकायदेशीर असून, त्याला विरोध करण्याची गरज आहे. सरकारने असा निर्णय घेतला तर मी त्याला कायदेशीर आव्हान देणार असल्याचे पुनावाला यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी जसा विरोध केला तसाच विरोध आता त्यांच्या स्मारकाबाबत होत आहे. जागा घोषित झाल्या झाल्या हा वाद सुरु झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने  केंद्रीय मंत्री मंडळाने सरकारी बंगले निवासस्थाने स्मारक करू नये असा घेतलेला निर्णय. पूनावाला यांनी महापौर निवास स्थानात स्मारक उभारल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा  दिलेला इशारा. महापौर बंगला सीआरझेड मध्ये येत आहे या ठिकाणी बांधकाम करणे पण  शक्य नाही. अश्या वेळी महापौर निवास स्थानकात स्मारक उभारता येवू शकत नाही तरीही महापौर बंगल्यात स्मारक उभारण्यासाठीचा हट्ट केला जात आहे.

महापौर बंगल्यात स्मारक उभारण्याचे म्हणजे भारताची आर्थिक राजधानी आणि जागतिक कीर्तीचे शहर असलेल्या मुंबईच्या महापौरांचा बंगला हडप करण्याचा डाव आहे. कायद्यात बसत नसताना मुख्यमंत्र्यांनी हा वाद लावून आपले अंग काढून घेतले असले तरी वादाला शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना सामोरे जावे लागणार आहे. उद्धव ठाकरे शिवसेना नेते मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात फसले असेच म्हणावे लागेल. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असताना पालिकेची संपत्ती मुख्यमंत्र्यांनी स्मारकाला दिली हे शिवसेनेला कळले सुद्धा नाही. पालिकाही असा निर्णय घेवू शकली असती परंतू तसे झालेले नाही.

मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात शिवसेना पुरती अडकली आहे. महापौर बंगला ठाकरे परिवाराला हवा आहे. त्यासाठी भाजपचे सरकार पाडले जाणार नाही अशी सेटिंग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना स्मारकाच्या वादात अडकवून भाजपा आणि त्यांचे सरकार आपले काम करत राहील आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये शिवसेनेचा मोठा भाऊ बनेल अशी योजना आहे. हि योजना न समजणाऱ्या शिवसेनेची आणि नेतृत्वाची किव येत आहे. असो राजकारण होतच राहील. महापौर बंगल्यातील बाळासाहेबांचे स्मारक मात्र कायद्याच्या कचाट्यात अडकून वादात अडकणार आहे हे मात्र नक्की आहे.

अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages