मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी हे अभ्यासासह क्रीडा क्षेत्रातही अव्वल राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पीक स्पर्धा असो किंवा राष्ट्रीय अथवा राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धा असो, या सर्व ठिकाणी महापालिका शाळेतील विद्यार्थी आपला ठसा उमटवित असतात. आता महापालिका शाळांमधून शिकलेल्या अथवा शिकत असलेल्या १२ विद्यार्थ्यांचा क्रिकेट संघ दुबईत २ ते ४ डिसेंबर २०१५ या दरम्यान होणा-या २० – २० क्रिकेट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे यासाठीचा आवश्यक असणारा खर्च व आवश्यक ते सर्व नियोजन ‘सलाम बॉम्बे फाऊंडेशन’ द्वारे केले जाणार आहे. या स्पर्धेत वेगवेगळ्या भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया, केनिया व संयुक्त अरब अमिरात (UAE) या सात देशातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
दुबई येथे १९ वर्षांखालील गटासाठी आयोजित करण्यात येणा-या २० – २० क्रिकेट स्पर्धेचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतील सहभाग हा अधिक चांगला व आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा, यासाठी प्रत्यक्ष स्पर्धेपूर्वी दि. २४ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २०१५ दरम्यान दुबई येथेच एका आठवड्याचे विशेष प्रशिक्षण सर्व विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. विशेष म्हणजे इंग्लंडच्या क्रिकेट चमूचे माजी कप्तान व सुप्रसिद्ध क्रिकेटपटू श्री. केविन पीटरसन यांच्या सहकार्याने व त्यांच्या संस्थेद्वारे हे प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांच्याच संस्थेद्वारे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट प्रशिक्षण व नंतर होणारी स्पर्धा यामध्ये महापालिका शाळेतील जे विद्यार्थी सहभाग घेणार आहेत, त्यापैकी बहुतांश विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक गटातील आहेत. यापैकी कुणाचे पालक ‘शेतकरी’ आहेत, तर कुणाचे पालक सुतारकाम, अंगमेहनतीचे काम, मिस्त्रीकाम, माळीकाम करतात. एका विद्यार्थ्याचे पालक हे निवृत्त मिल कामगार आहेत तर एका विद्यार्थ्याचे पालक हे वाहनचालक आहेत.
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या सहकार्याने क्रिकेट विषयक प्रशिक्षण दिले जात आहे. सन २००५ पासून सुमारे १५०० विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ घेतला आहे. या प्रशिक्षणांतर्गत दरवर्षी सहावीतील विद्यार्थ्यांसाठी एका विशेष क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात असते. गेल्या वर्षी झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये महापालिकेच्या विविध शाळांमधील ६० संघ सहभागी झाले होते. यामध्ये ४८ संघ हे मुलग्यांचे होते, तर १२ संघ हे मुलींचे होते.

No comments:
Post a Comment