वैद्यकीय सेवा बजावताना सामाजिक भान जपणे आवश्यक - डॉ.दीपक सावंत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वैद्यकीय सेवा बजावताना सामाजिक भान जपणे आवश्यक - डॉ.दीपक सावंत

Share This
मुंबई - नेत्रशस्त्रक्रियेसाठी जी प्रचलित मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत त्याचा वापर करुन आणि सामाजिक भान ठेवून करावी. शस्त्रक्रियेपश्चात रुग्णांची देखभाल तितकीच महत्त्वाची आहे. वैद्यकीय सेवा करताना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केले.

जे.जे.रुग्णालय येथे आरोग्य संचालनालय, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जे.जे. रुग्णालय यांच्यामार्फत ‘नेत्र शस्त्रक्रिया : जंतूसंसर्ग व त्यावरील उपचार’ याविषयी राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी डॉ.सावंत बोलत होते. जे.जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.तात्याराव लहाने, आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार, सहसंचालक साधना तायडे, डॉ. रागिणी पारेख, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे राज्य समन्वयक डॉ.पी.देशमुख आदी उपस्थित होते.

आरोग्य सेवेत कार्यरत असलेले वैद्यकीय तज्ज्ञ, अधिकारी व कमचाऱ्यांनी वैद्यकीय क्षेत्रात होत असलेले नवीन संशोधन, शोध व तंत्रज्ञ याविषयीचे ज्ञान आत्मसात करुन आरोग्यसेवेसाठी सक्षम व्हावे. आरोग्य सेवेविषयी टेलिमेडिसीनच्या माध्यमातून येत्या पाच वर्षात ऑनलाईन मार्गदर्शन करण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत, असे सांगून डॉ.सावंत पुढे म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात काम करताना केवळ उद्दीष्ट पूर्ण करायचे आहे म्हणून कोणीही काम करु नये. आपण लोकांना दृष्टी देऊ शकत नाही तर असलेली दृष्टी हिरावू शकत नाही. लोकांना दृष्टी देत असताना सामाजिक भावना जपली जाणे आवश्यक आहे. शस्त्रक्रिया करताना चुका होत असतात पण चुकीचे कोणते परिणाम होतील यांची जाणीव देखील असणे गरजेचे आहे. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान अद्ययावत करुन त्याचा वापर करावा.

शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांनी काय काळजी घ्यावी याची माहिती रुग्णास व त्याच्या नातेवाईकांना देणे महत्त्वाचे आहे. रुग्णांची विचारपूस करणे ही प्राथमिक जबाबदारी आपली आहे, याची जाणीव ठेवावी. याचबरोबर नेत्रशल्यचिकित्सांनी शस्त्रक्रिया गृहाला प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करावी. तसेच शस्त्रक्रियेबाबत जी मार्गदर्शक तत्वे करण्यात आली आहेत त्यापद्धतीनेच शस्त्रक्रिया केली पाहिजे, जर शस्त्रक्रिया करताना गुंतागुत झाली असेल तर त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे मागदर्शन घ्यावे, अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केली.

प्रारंभी डॉ. सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. लहाने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ.सतीश पवार यांनी केले. कार्यशाळेस राज्यभरातील नेत्रशल्यचिकित्सक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages