एसी लोकल फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 November 2015

एसी लोकल फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होणार

मुंबई : मुंबईतील रेल्वे प्रवाशांना गारेगारअनुभव देणारी एसी (वातानुकूलित) लोकल आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होणार आहे. चेन्नईतील रेल्वेच्या आयसीएफमध्ये (इंटीग्रल कोच फॅक्टरी) एसी लोकलवर काम सुरू असून, मुंबईकडे रवाना करण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी असल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

एमयूटीपी-२ अंतर्गत बम्बार्डियर कंपनीच्या नव्या लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर दाखल होत आहेत. यातील ७२ पैकी १० लोकल ताफ्यात दाखलही झाल्या आहेत. याचबरोबरच पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकल चालविण्याचा निर्णयही रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यानुसार, चेन्नईतील आयसीएफमध्ये एसी लोकलचे काम सुरू आहे.
ही लोकल १२ डब्यांची असून, त्यावर सध्या जोमाने काम सुरू आहे. याबाबत रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘एसी लोकलचे काम ७0 टक्के पूर्ण झाले आहे. आयसीएफला ही लोकल मुंबईकडे रवाना करण्यासाठी ३१ जानेवारीची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार काम करण्यावर भर दिला जात आहे. सध्या काही तांत्रिक कामे पूर्ण केली जात आहेत. आयसीएफमधून एसी लोकल रवाना केल्यानंतर, मुंबईत येण्यासाठी सात ते दहा दिवस लागतील,’ असे सांगण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडून सध्या धावत असलेल्या लोकल गाड्यांना एक एसी डबा बसवून, लोकल चालविण्याचा विचार केला जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad