मुंबई: मुंबई मेट्रोची तिकिट दरवाढ हा मुंबई मेट्रोवन कंपनीचा निर्णय असला तरीही,अप्रत्यक्षपणे त्याला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आराेप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला आहे. कारण या कंपनीला गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या तोट्याची भरपाई अनुदान रुपाने देण्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्यानेच ही दरवाढ झाली असून त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशाला चाट बसली आहे. एकिकडे न्यायालयासमोर किंवा जनतेसमोर तिकिट दरवाढीविरोधात भुमिका घ्यायची आणि दुसरीकडे तिकिट दरवाढीसाठी छुप्या मार्गाने संबंधित कंपनीला मदत करायची, अशी दुटप्पी भुमिका या सरकारची असल्याचेही ते म्हणाले.
येत्या १ डिसेंबरपासून मुंबई मेट्रोवन प्रा. लि. या कंपनीच्या वतीने मुंबई मेट्रो रेल्वेच्या तिकिट दरात वाढ केली आहे. किमान १० रुपये हे तिकिट दर कायम ठेवून पुढच्या टप्प्यातील तिकीट दरात प्रत्येकी पाच रुपये वाढ करण्यात आली आहे. तसेच मासिक पासच्या दरातही ४५ ते ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.अगोदरच जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडलेले असतानाच या तिकीट दरवाढीने मुंबईकरांना मोठा आर्थिक भार सोसावा लागणार आहे. याबाबत बोलताना अहिर म्हणाले की, राज्य सरकारने जर या प्रकरणात वेळीच हस्तक्षेप केला असता, तर ही दरवाढ टाळता आली असती. कारण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आर्थिक वर्षात या कंपनीला ३०० कोटीचा आर्थिक तोटा झाला आहे. ही रक्कम आपल्याला अनुदाना पोटी राज्य सरकारने द्यावी,अशी मागणी कंपनीच्या वतीने करण्यात आली होती. अन्यथा आम्ही दरवाढ करून ही रक्कम वसुल करू अशी भुमिका कंपनीने घेतली होती. मात्र त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून सरकारने एक प्रकारे कंपनीला दरवाढीसाठी हिरवा कंदीलच दाखवल्याचे अहिर म्हणाले. हे सरकारचे नाकर्तेपण तर आहेत, शिवाय सरकारची ही भुमिका पाहता सत्ताधाऱ्यांचे कंपनीशी साटेलोटे असल्याचा संशय घेण्यास जागा असल्याचेही ते म्हणाले.

No comments:
Post a Comment