बाबासाहेबांच्या स्मारकाच्या आराखड्यात बदलासाठी महापारीनिर्वांदिनी आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 November 2015

बाबासाहेबांच्या स्मारकाच्या आराखड्यात बदलासाठी महापारीनिर्वांदिनी आंदोलन

मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले आहे. आमचा बाबासाहेबांच्या स्मारकाला किंवा स्मारकाच्या भूमिपूजनाला विरोध नाही तर स्मारकाच्या आराखड्याला विरोध आहे. डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी बनवण्यात आलेला आराखडा योग्य नसल्याने हा आराखडा रद्द करावा या मागणीसाठी महापरिनिर्वाणदिनी (6 डिसेंबर) आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेने दिला आहे.

इंदू मिल येथील स्मारकाच्या आराखड्याचे संकल्प चित्र मंजूर करताना कोणाशीही चर्चा करण्यात आलेली नव्हती. स्मारकासाठी नेमण्यात आलेल्या सुकाणू समितीलाही अंधारात ठेवून शशी प्रभू यांचे संकल्प चित्र मंजूर करण्यात आले आहे. संकल्प चित्राला विरोध म्हणून स्मारकाच्या आराखड्यात बदल सुचवणारी हजारो पत्रे आंबेडकरांच्या अनुयायांनी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे पाठवली असल्याचे रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले आहे.  

स्मारकाच्या संकल्प चित्रामध्ये सुचवलेले बदल जो पर्यंत मान्य होत नाही तो पर्यंत स्मारकाचे काम सुरू करू देणार नाही, असा इशारा आनंदराज आंबेडकर यांनी दिला. आंबेडकर स्मारकाच्या नावावर उद्यानाचा आराखडा बनवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी नेमण्यात आलेल्या समितीप्रमाणे आंबेडकर स्मारकासाठी समिती का नेमण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी केला. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी ऐतिहासिक महापौर बंगला देण्याच्या निर्णयालाही आनंदराज यांनी विरोध दर्शवला आहे. सरकारने याबाबत सदसद्विवेक बुद्धीने निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

नुकताच भाजपा समर्थक रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचा विजयी मेळावा संपन्न झाला होता. या विजयी मेळाव्यात स्मारकाचा आराखडा अंतिम झाला असून, त्यामध्ये किरकोळ बदल करता येतील; मात्र मोठे बदल करण्यात येणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी या संदर्भातील वाद मिटवण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांनी केलेले आवाहन रिपब्लिकन सेनेने धुडकावले असल्याने येत्या ६ डिसेंबरला पुन्हा इंदू मिल आंदोलनाची (२०११) पुनरावृत्ती होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.    

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad