कांजूर क्षेपणभूमी व प्रक्रिया केंद्रातून येणाऱया दुर्गंधीवर तोडगा शोधावा - स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कांजूर क्षेपणभूमी व प्रक्रिया केंद्रातून येणाऱया दुर्गंधीवर तोडगा शोधावा - स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे

Share This
तांत्रिक उपाय शोधून लवकरच संयुक्त बैठक आयोजित करणार – आयुक्त अजोय मेहता
मुंबई / प्रतिनिधी
कांजूर क्षेपणभूमी आणि कचरा प्रक्रिया केंद्रातून येणारी दुर्गंधी ही परिसरातील नागरिकांच्या नाराजीचे कारण आहे, त्यावर तोडगा निघाला तर या क्षेपणभूमीला होत असलेला विरोध मावळेल, त्या दृष्टीने प्रशासनाने त्वरेने पावले उचलावीत, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी प्रशासनाला दिले आहेत. कांजूर क्षेपणभूमी व प्रक्रिया केंद्राची संपूर्ण पाहणी केली असून त्याच्या तांत्रिक बाबी व उणिवा समजून घेण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करण्यात येईल. दुर्गंधी रोखण्यासाठी तांत्रिक उपाय शोधून लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्यासमवेत संयुक्त बैठक आयोजित करु, असे आश्वासन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी प्रशासनाच्या वतीने दिले.

स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे आणि स्थायी समितीचे सदस्य तसेच महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज (दिनांक १९ नोव्हेंबर, २०१५) मुलुंड मुख्य क्षेपणभूमी, कांजूर मुख्य क्षेपणभूमी आणि देवनार मुख्य क्षेपणभूमी यांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. गोराई कचरा हस्तांतरण केंद्र येथून दोन वर्षे (७३० दिवस) कालावधीसाठी कचरा काढून तो मुलुंड, देवनार, कांजूर येथील मुख्य क्षेपणभूमीपर्यंत अंतिम विल्हेवाट लावण्याकरीता वाहून नेण्याबाबतचा विषय स्थायी समितीच्या सभेमध्ये दिनांक ०९ नोव्हेंबर, २०१५ रोजी चर्चेस आला होता. या अनुषंगाने स्थायी समितीने हा पाहणी दौरा आयोजित केला होता.

समितीने प्रारंभी मुलुंड क्षेपणभूमीची पाहणी केली. त्यानंतर कांजूर क्षेपणभूमी आणि तेथील जैविक प्रक्रिया केंद्र व अखेरीस देवनार क्षेपणभूमीची पाहणी केली. त्यावेळी मुख्यत्वे कांजूर येथील घन कचरा प्रक्रिया प्रकल्पातून वायूनिर्मिती सुरु झाली असून बायोरिऍक्टर तंत्रज्ञानाच्या आधारे कचऱयावर प्रक्रिया करणारा हा भारतातील पहिलाच प्रकल्प असल्याचे संबंधित अधिकारी व तंत्रज्ञांनी सांगितले. कांजूर क्षेपणभूमी व तेथील प्रक्रिया केंद्राची सविस्तर माहिती सेफ ट्रीट इंजिनिअर्स ऍण्ड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा.लि. चे तंत्रज्ञ विवेक दलाल यांनी सादर केली. तथापि, या कचऱयातून स्रवणारे दुर्गंधीयुक्त पाणी परिसरात दुर्गंधी पसरविण्यास कारणीभूत असल्याचा आक्षेप आमदार अशोक पाटील, आमदार सुनील राऊत, धनंजय पिसाळ, दत्ता दळवी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी नोंदविला. तर रमेश कोरगांवकर यांनी सांगितले की, प्रकल्प उभारण्यापूर्वी करण्यात आलेल्या सादरीकरणाप्रमाणेच कार्यवाही होत आहे किंवा कसे, प्रक्रिया केल्यानंतर प्रकल्पातून प्राप्त होणारे पाणी उद्यानांना पुरविले जाते आहे किंवा कसे, या सर्व बारकाव्यांचे प्रशासनाने आढावा घेऊन माहिती द्यावी.

लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या भावना जाणून घेतल्यानंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संपूर्ण प्रकल्पाची पायपीट करुन पाहणी केली व सर्वंकष माहिती समजून घेतली. सदर प्रक्रिया केंद्राची पूर्ण पाहणी केली असून त्याच्या तांत्रिक बाजूंचे सादरीकरण करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी, कंत्राटदार, प्रक्रिया केंद्राचे तंत्रज्ञ यांना येत्या आठवड्यात महापालिका मुख्यालयात येण्याच्या सूचना आयुक्त मेहता यांनी केल्या. प्रक्रिया केंद्रातून येणाऱया दुर्गंधीवर नियंत्रण करण्यासाठी निश्चितच उपाय शोधून काढू आणि त्याची माहिती सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना संयुक्त बैठकीत दिली जाईल, असे मेहता यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages