महापरिनिर्वाण दिनासाठी येणाऱ्या अनुयायांना चांगल्या सुविधा द्या- मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापरिनिर्वाण दिनासाठी येणाऱ्या अनुयायांना चांगल्या सुविधा द्या- मुख्यमंत्री

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासनाने तयारी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीसंबंधीची आढावा बैठक मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

महापालिकेने केलेल्या तयारीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी येथे येत असतात. या अनुयायांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी राज्य शासन तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका व पोलीस खाते तयारी करत आहे. अनुयायांना चांगल्या सोयीसुविधा मिळण्याबरोबरच त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. यावर्षी अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करून या दिवसाचे पावित्र्य राखण्यात यावे, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत.

महापरिनिर्वाण दिन शांततेत पार पाडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती नेहमीच सहकार्य करीत असते. ही समिती शासन व अनुयायी यांच्यात दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी चैत्यभूमी परिसरात देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. दर्शनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी चैत्यभूमी व परिसरात मंडप, पिण्याच्या पाण्याचे नळ तसेच टँकर, बंदिस्त व फिरती शौचालये, रुग्णवाहिका, नियंत्रण कक्ष आदी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

रेल्वेमार्फत 5 व 6 डिसेंबर या काळात विशेष लोकल गाड्या चालविण्यात येणार असून यादिवशी रात्री तीनही मार्गावर लोकलच्या विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तसेच मध्य रेल्वेमार्फत या काळात नागपूरसाठी 6 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असून कोकण विभागातही विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव गौतम चटर्जी, सामाजिक न्याय विभागाचे सचिव उज्ज्वल ऊके, गृह विभागाचे प्रधान सचिव रजनीश शेठ, एमएमआरडीएचे यू.पी.एस. मदान, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) के. एल. बिष्णोई, मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी ए. शैला, सहपोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) मिलिंद भारंबे, बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक यांच्यासह तीनही रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages