मोदींची स्मार्ट सिटी योजना ही निव्वळ धूळ फेक : राज ठाकरे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मोदींची स्मार्ट सिटी योजना ही निव्वळ धूळ फेक : राज ठाकरे

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - केंद्र सरकारने जाहीर केलेली स्मार्ट सिटी ही योजना फसवी असून ही निव्वळ धूळ फेक असल्याची टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी केली. या योजनेअंतर्गत मिळणारा तुटपुंजा निधी शहरांना स्मार्ट बनवण्यासाठी पुरेसा नसल्याचे सांगत ही योजना म्हणजे राजकीय श्रेय घेण्यासाठीचा डाव असल्याचेही ते म्हणाले. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातही जेएनआरआरयूएमच्या माध्यमातून शहरांचा विकास होत होताच, मग आता पुन्हा नवी कंपनी स्थापन करण्याची गरज काय होती, असा सवाल करत त्यांनी भाजप सरकारच्या हेतूवरच शंका उपस्थित केली. 
राज म्हणाले, देशातील अनेक महानगरपालिका आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. मग फक्त राजकीय फायदा उपटण्यासाठी स्मार्ट सिटी योजना त्यांच्यावर लादण्यात काेणते शहाणपण आहे? शिवाय या योजनेसाठी दरवर्षी शंभर कोटी इतका निधी केंद्राकडून येणार आहे. पण मुंबई महापालिकेसारख्या मोठ्या महापालिकांचा वार्षिक अर्थसंकल्पच तीस ते पस्तीस हजार कोटींचा असतो. मग या शंभर कोटींच्या वापराने शहरात असा कोणता अामूलाग्र बदल होणार आहे, असा सवाल त्यांनी या वेळी केला. स्मार्ट सिटीच्या नावाखाली सरकार राजकारण करू पाहते आहे. त्यामुळे आपला या योजनेला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. 

मोदींवर पुन्हा निशाणा : 
मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना राज्यांच्या स्वायत्ततेच्या गोष्टी करायचे. आता पंतप्रधान झाल्यावर मात्र त्यांना या सर्व बाबींचा विसर पडला आहे का? आमचे गुजरात आम्ही स्वबळावर चालवू, आम्हाला केंद्राचा एक रुपयाही नको, असे
त्या वेळी ते म्हणायचे. मग आता ते अशा फसव्या योजना राबवून राज्यांना त्यात सहभागी होण्याची सक्ती का करत आहेत? अशा शब्दांत राज ठाकरे यांनी थेट मोदींवरच निशाणा साधला.
अणेंचा बोलविता कोण?
स्वतंत्र विदर्भावरून सध्या सुरू असलेल्या वादासंदर्भात ठाकरे म्हणाले, मनसेचा या मागणीला विरोध आहे. मुळात हा प्रश्न श्रीहरी अणेंच्या अधिकारात येतो का? नाहक राजकीय मुद्दे उकरून काढण्याची गरज नाही. अणेंचा बोलविता धनी नेमका कोण आहे हे समोर आले पाहिजे. मुख्यमंत्री हे स्वत: विदर्भातील आहेत. त्यांना विदर्भातील समस्यांची जाण आहे तर मग त्यांनी ते प्रश्न सोडवावेत. त्यासाठी महाराष्ट्राचा तुकडा पाडण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages