रस्ते दुरुस्तीची कामे २४ तास करण्याची वाहतूक पोलिसांची परवानगी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रस्ते दुरुस्तीची कामे २४ तास करण्याची वाहतूक पोलिसांची परवानगी

Share This
शहर भागातील रस्ते दुरुस्तीची कामे लवकर पूर्ण करणे पालिकेला शक्य !
मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील शहर विभागात असणा-या रस्त्यांची दुरुस्ती कामे  वाहतूक पोलीसांच्या परवानगीने केवळ रात्रीच करत येत असत, ज्यामुळे सदर कामे पूर्ण होण्यास अधिक कालावधी लागत असे.  मात्र आता शहर विभागात रस्ते दुरुस्तीची कामे २४ तास करण्यास मुंबई वाहतूक पोलिसांनी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.  ज्यामुळे साहजिकच रस्ते दुरुस्तीची कामे पूर्वीपेक्षा अधिक वेगाने व कमी कालावधीत करणे शक्य होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. 

बृहन्मुंबई महापालिकेच्या शहर विभागात रस्ते दुरुस्तीची कामे करावयाची झाल्यास सदर कामे वाहतूक पोलिसांच्या संबंधित परवानगी नुसार केवळ रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत करता येत असत.  ज्यामुळे साहजिकच रस्ते दुरुस्ती करण्यास अधिक वेळ लागत असे.    मात्र आता शहर विभागातील रस्ता दुरुस्तीची कामे २४ तास करण्यास मुंबई वाहतूक पोलिसांनी परवानगी दिली आहे. प्राप्त झालेल्या पहिल्या पत्रानुसार २६ ठिकाणी प्रस्तावित असणा-या रस्ते दुरुस्तीसाठी परवानगी मिळालेली आहे. यामध्ये प्रामुख्याने ताडदेव, मलबार हिल, पायधुनी, काळबादेवी, भायखळा, नागपाडा, माटुंगा, भोईवाडा, वडाळा, वरळी, माहिम आणि कुलाबा यापरिसरातील रस्ते आहेत. हे सर्व रस्ते दुरुस्तीची कामे वाहतूक पोलीसांच्या सल्ल्यानुसार व वाहतूकीला अडथळा होणार नाहीत अशा पद्धतीने करणे व ध्वनी मर्यादा पाळणे संबंधित कंत्राटदारांना आवश्यक असणार आहे. मात्र ही कामे करताना चौकातील (Junction) खोदकाम विषयक कामे मात्र पूर्वीप्रमाणेच रात्री ११ ते सकाळी ६ या दरम्यान करणे आवश्यक असणार आहे.

महापालिका व मुंबई पोलीस यांच्यातील संवाद वाढावा व नागरी सेवा सुविधा विषयक बाबींची कार्यवाही अधिक वेगाने व्हावी, यादृष्टीने महापालिका आयुक्त अजोय मेहता व पोलिस आयुक्त (मुंबई) जावेद अहमद यांनी पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्त (मुंबई) यांच्यात सप्टेंबर २०१५ पासून समन्वय बैठक व पाहणी दौरे आयोजित करण्यात येत आहेत.  तसेच परिमंडळीय स्तरावर देखील दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी महापालिकेच्या सर्व सातही परिमंडळाचे उपायुक्त व मुंबई पोलीस दलाच्या सर्व संबंधित परिमंडळांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त / पोलीस उपायुक्त यांच्यात समन्वय बैठका आयोजित करण्यात येत आहेत. या सर्व सुसंवादाचा सकारात्मक परिणाम विविध कार्यवाहींच्या अनुषंगाने आता दिसू लागला आहे. याच सुसंवादातून आता रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे २४ तास करता येणार आहेत. ज्यामुळे सदर कामे अधिक वेगाने करणे शक्य होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages